पुण्यात मुदत संपल्यानंतर आली २१० गणेश मंडळांना जाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 07:20 PM2019-08-26T19:20:10+5:302019-08-26T19:21:06+5:30
मंडप टाकणे, कमानी उभारणे, देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू आहे.
पुणे : न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका अधिकारी, पोलिस प्रशासनांने वेळोवेळी गणेश मंडळांना मंडप, कमांनी उभारण्यासाठी परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पध्दतीने अर्ज घेण्यासाठी खास यंत्रणा निर्माण केली. परंतु, त्यानंतर देखील शहरातील तब्बल २०० हून अधिक गणेश मंडळांनी मंडप, कमांनीसाठी परवानगी घेतलेली नाही. आता या गणेश मंडळांना जाग आली असून, परवानगी मिळविण्यासाठी धावपळ सुरु केली आहे.
पुण्यासह संपूर्ण राज्यात येत्या २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. यासाठी मंडप टाकणे, कमानी उभारणे, देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू आहे. न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेबाबत निर्णय देताना न्यायालयाने सर्व गणेश मंडळांना मंडप, कमांनी उभारण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. गतवर्षीपासून अशाप्रकारे परवानगी न घेणा-या मंडळांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येत असून, या पथकामार्फत प्रत्येक मंडळांची तपासणी करण्यात येते. महापालिकेच्या वतीने यंदा सर्व गणेश मंडळांना मंडप, कमानीसाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यास २० ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये शहरातील केवळ १ हजार ९९६ गणेश मंडळांनीच अर्ज केले आहेत. अद्यापही शहरातील सुमारे २०० हून अधिक गणेश मंडळांनी मंडप, कमानीसाठी अर्ज केलेला नाही. परंतु आता मंडप, कमांनी घालण्यास सुरुवात झाल्याने व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकांकडून जोरदार तापसणी सुरु झाली आहे. यामुळे शिल्लक गणेश मंडळांकडून परवानगी मिळावी, महापालिकेने अर्ज स्विकारावेत यासाठी राजकीय दबाव सुरु केला आहे. यंदा ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील अर्ज स्विकारल्याने ऑफ लाईन बॅक डेटेड तारखा दाखवून या मंडळांना परवानगी देण्याच्या देखील हालचाली सुरु आहेत.