शहरात निर्माण होतोय दररोज २१०० टन कचरा; मात्र ५१८ टन कचऱ्यावरच प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:25 AM2018-07-27T04:25:49+5:302018-07-27T04:27:38+5:30
कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पुणेकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम
पुणे : शहरामध्ये दररोज तब्बल २००० ते २१०० टन कचरा गोळा होत असून, प्रक्रिया केवळ ५१८ टन कचºयावरच होत असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात समोर आली आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पुणेकरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक आजारांना यामुळे निमंत्रण दिले जात असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले.
नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमुळे दररोज निर्माण होणाºया कचºयामध्येदेखील वाढ झाली आहे. सध्या शहरामध्ये दररोज तब्बल २००० ते २१०० टन इतका प्रचंड कचरा निर्माण होतो. यामध्ये ई-कचरा, जैववैद्यकीय कचरा अशा विविध प्रकारच्या कचºयाचा समावेश आहे. यात पालखी, दिवाळी, दसरा अशा विविध सण-समारंभादरम्यान दररोज कचºयामध्ये २०० ते ३०० टनाने वाढ होते. याशिवाय १५० ते १८० टन बांधकाम क्षेत्रातील, ५० ते ६० टन गार्डन वेस्ट आणि ५ ते ६ टन जैववैद्यकीय कचरा निर्माण होतो.
महापालिकेच्या वतीने कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यासाठी शहरात विविध ठिकाणी अनेक लहान-मोठे कचरा प्रक्रिया प्रकल्प देखील उभारण्यात आले. परंतु यातील ५० टक्क्यांहून अधिक प्रकल्प हे नेहमीच विविध कारणांनी बंद असतात. त्यामुळे शहरात दररोज २ हजार टनपेक्षा कचरा निर्माण होत असताना प्रक्रिया केवळ ५१८ टन कचºयावर होते. दरम्यान, शहरात निर्माण होणाºया कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून खासगी संस्थेला हे काम करण्यात आले आहे. परंतु शहरात केवळ ६३ टक्केच कचºयाचे वर्गीकरण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
जैववैद्यकीय ५० टक्केच कचºयावर प्रक्रिया
शहरातील सुमारे ४०० ठिकाणांहून विविध हॉस्पिटल, दवाखान्यांमधून जैववैद्यकीय कचरा गोळा केला जातो. शहरामध्ये दररोज सुमारे ६ टनपेक्षा अधिक जैववैद्यकीय कचरा गोळा होतो. परंतु यापैकी सध्या केवळ ३ टन कचºयावर प्रक्रिया होत असल्याचे महापालिकेच्याच पर्यावरण अहवालात म्हटले आहे. जैववैद्यकीय कचरा पर्यावरण आणि मानवासाठी हानिकारक असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले.
शहरात वर्षाला १० हजार टन ई-वेस्ट
आयटी शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या पुण्यात इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ‘ई-वेस्ट’ कचºयाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यात दरवर्षी तब्बल १० हजार टन हा ई-वेस्ट निर्माण होत असून, या कचºयाची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या सध्या महापालिकेच्या समोर आहे. कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लागल्याने मोठ्या प्रमाणात साथीचे व जीवघेण्या आजारांचे रोगजंतू पसरू शकतात. तसेच काही भागांत यामुळे पाण्याचे स्रोतदेखील दूषित होत असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात स्पष्ट केले आहे.