बारामतीत आठ दिवसांत २१३ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:13+5:302021-02-26T04:12:13+5:30
बारामती : दिवसेंदिवस वाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने बारामतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या आठ दिवसांत बारामती शहर आणि तालुक्यात ...
बारामती : दिवसेंदिवस वाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने बारामतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या आठ दिवसांत बारामती शहर आणि तालुक्यात २१३ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर, गेल्या २४ तासांत बारामती परिसरात ३५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
गेल्या अडीच महिन्यांत प्रथमच ३० पेक्षा अधिक रुग्ण सापडण्यास १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर कोरोनाचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध होण्याची, दक्षता घेण्याची गरज आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी गुरुवारी गेल्या २४ तासांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बारामती शहरातील २३ आणि ग्रामीणमधील १२ रुग्णांचा समावेश आहे. अडीच महिन्यांत प्रथमच रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन देखील धास्तावले आहे. बारामतीची आजपर्यंतची रुग्णांची संख्या ६ हजार ६७६ वर पोहोचली आहे. तर, ६ हजार २८३ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण १४५ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.
चौकट
विनामास्क फिरणाऱ्यांवर नजर
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासन अधिक सर्तक झाले आहेत. विशेष पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली आहे. प्रत्येक चौकात असे नागरिक पोलिसांच्या रडारवर आहेत. आता विनामास्क फिरणाऱ्या महाभागांकडून ५०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाही काही महाभाग विनामास्क फिरताना दिसतात. नगरपालिका प्रशासनाने मास्कशिवाय दुकानात प्रवेश करू नये, असे फलक शहरातील प्रत्येक दुकानावर लावले आहेत. मात्र, दुकानांमध्ये येणाऱ्या काही उदासीन नागरिकांकडून याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचा धोका स्पष्ट आहे.