पुणे जिल्ह्यात २१४ संवेदनशील तर ४ असुरक्षित मतदान केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 01:15 PM2019-04-19T13:15:37+5:302019-04-19T13:19:50+5:30
जिल्हा प्रशासनाने निवडणूकीची आवश्यक असलेली तयारी पूर्ण केली असून संवेदनशील केंद्रांवरील मतदान शांततेत पार पडावे याबाबतची खबरदारी घेतली गेली आहे...
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे संवेदनशील व असुरक्षित मतदान केंद्रांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात एकूण २१४ संवेदनशील तर ४ असुरक्षित मतदान केंद्र आहेत. त्यात पुणे लोकसभा मतदार संघात सर्वाधिक ९१ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मात्र, जिल्ह्यातील सुमारे १ हजार मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व निवडणूकांदरम्यान कायदा सुव्यवस्था राखली जावी. तसेच निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात; या उद्देशाने जिल्ह्यातील संवेदनशील व असुरक्षित मतदान केंद्रांकडे जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. संवेदनशील व असुरक्षित केंद्रांवर ‘सुक्ष्म निरीक्षक’आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठविलेल्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनात केले जाणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुणे लोकसभा मतदार संघात येणाºया पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदार संघात सर्वाधिक २१ मतदान केंद्र संवेदशील आहे. तर वडगावशेरी मतदार संघात १६ आणि कसबा पेठ आणि शिवाजीनगरमध्ये प्रत्येकी १४ आणि कोथरूडमध्ये ९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.
बारामती मतदारसंघात एकूण ६३ मतदान केंद्र संवेदनशील असून इंदापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १९ संवेदनशील मतदान केंद्र आहेत.तर खडकवासला मतदार संघात १३, बारामती व दौंडमध्ये प्रत्येकी ९ आणि भोरमध्ये ८ तर पुरंदरमध्ये ५ संवेदनशील केंद्र आहेत, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी सांगितले.
----
जिल्हा प्रशासनाने निवडणूकीची आवश्यक असलेली तयारी पूर्ण केली असून संवेदनशील केंद्रांवरील मतदान शांततेत पार पडावे याबाबतची खबरदारी घेतली गेली आहे. जिल्ह्यातील तब्बल १ हजार मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाणार आहे. त्यात संवेदनशील मतदान केंद्रांचाही समावेश आहे. त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रांवर कोण येत आहे, कुठे बुबार मतदान होत आहे, कोणत्या केंद्रांवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते. तसेच निवडणूक अधिकारी योग्य पध्दतीने काम करतात किंवा नाही, याबाबतची माहिती वेबकास्टिंगमुळे तात्काळ समजू शक णार आहे.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे