मराठीत २२ टक्के नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांची दैना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 05:56 AM2019-06-09T05:56:10+5:302019-06-09T05:58:41+5:30
लोकमत विशेष । अडीच लाख मायबोलीला अडखळले
पुणे : एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची चर्चा व आग्रह सुरू असतानाच दहावी परीक्षेच्या निकालातून मात्र मायबोली मराठीमध्येच अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे उघड झाले आहे. दहावी निकालाचा टक्का घसरला असताना मराठीच्या परीक्षेतही विद्यार्थी अडखळले आहेत. यंदा ११ लाख ९३ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी पहिली भाषा म्हणून ‘मराठी’ची परीक्षा दिली. यापैकी तब्बल २ लाख ५७ हजार ६२७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मराठीची परीक्षा देणारे २१.५८ टक्के विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण २०१८ च्या तुलनेत खूपच जास्त आहे. मराठी भाषेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण यंदा केवळ ७८.४२ टक्के इतके आहे.
मराठीखेरीज हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगू, सिंधी आणि बंगाली हे पर्याय ‘पहिली भाषा’ म्हणून उपलब्ध होते. या सर्व भाषा घेणाऱ्यांत उत्तीर्ण होणाºयांचे प्रमाण मराठीपेक्षा अधिक आहे. इंग्रजी ही पहिली भाषा घेणारे ९0 टक्के विद्यार्थी यंदा पास झाले. पण तो आनंद मराठीच्या नशिबी आला नाही. गेल्या वर्षी मराठी भाषेत उत्तीर्ण होणाºयांचे प्रमाण ९०.९६ टक्के होते. ते यंदा १२ टक्क्यांनी खाली आले.
भाषा या विषयात मिळणारे कमी गुण, विद्यार्थ्यांचे त्याकडे होणारे दुर्लक्ष, तसेच या विषयात विद्यार्थी मागे पडत असला तरी त्यासाठी शिकवणी वा क्लासमध्ये पाठवण्यास पालकांकडून होणारी टाळाटाळ ही इतके विद्यार्थी नापास होण्यामागची कारणे असावीत. इंग्रजीसाठी विद्यार्थ्यांना क्लास वा शिकवणीला हमखास पाठवले जाते. पण मराठीसाठी तसा विचार होत नाही. तसेच मराठी तर आपली मातृभाषाच आहे, या विचाराने त्याकडे विद्यार्थीही फार गंभीरपणे पाहत नसावेत, असे तज्ज्ञांना वाटते. याशिवाय इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची भाषा व सामाजिक शास्त्र विषयाची तोंडी परीक्षा बंद केल्यामुळे या विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार दिले जाणारे तोंडी परीक्षेचे गुण बंद करण्याचा निर्णय मंडळाने घेतल्यामुळे भाषा विषयांच्या निकालात कमालीची घट झाली आहे. मात्र, गणित व विज्ञान विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण बंद झालेले नाहीत. त्यामुळे या विषयांच्या निकालावर फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.
मराठीतच कमी का?
भाषा विषयात कधीच चांगले गुण मिळत नाही, अशी विद्यार्थ्यांची कायमची तक्रार असते. पण भाषेकडे विद्यार्थ्यांचे बºयाचदा दुर्लक्ष होते. इंग्रजी, संस्कृत, हिंदी वा सिंधी, उर्दू ही पहिली भाषा घेणाºयांना अधिक गुण मिळत असतील, तर मराठीच कमी गुण का, हाही प्रश्न आहे.