Pune: होळीला मध्य रेल्वेच्या २२ विशेष गाड्या; सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी ट्रेन
By अविनाश रावसाहेब ढगे | Published: March 8, 2024 04:29 PM2024-03-08T16:29:47+5:302024-03-08T16:31:24+5:30
पुणे विभागातून २० ते ३१ मार्च दरम्यान सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे...
पिंपरी : गणेशोत्सवाबरोबरच होळी अर्थात शिमगा सणही कोकणात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. होळीनिमित्त मोठ्या प्रणाणात नागरिक कोकणात आपल्या गावी जातात. त्यामुळे नागरिकांची गौरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे प्रशानाने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातून २० ते ३१ मार्च दरम्यान सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. या विशेष ट्रेनचे १० मार्चपासून आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
पुणे-सांवतवाडी विशेष एक्सप्रेस
पुणे-सांवतवाडी एक्सप्रेस १२, १९ आणि २६ मार्चला पुण्याहून सकाळी नऊ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. तर, १३, २० आणि २७ मार्चला रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी पुण्यासाठी सुटेल. ही ट्रेन लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड़, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.
पुणे-थिविम विशेष एक्सप्रेस
पुणे-थिविम विशेष एक्सप्रेस ८, १५, २२ आणि २९ मार्चला पुण्याहून सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. तर, १०, १७, २४ आणि ३१ मार्चला सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी थिविम येथून सुटेल. ही ट्रेन लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड़, चिपळूण, सावरदा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापुर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ आणि सांवतवाडी या स्थानकांवर थांबेल.
पुणे-दानापूर विशेष एक्स्प्रेस
पुणे-दानापूर एक्सप्रेस १७ आणि २४ मार्च रोजी पुण्याहून सायंकाळी चार वाजून १५ मिनिटांनी सुटेल. तर दानापूर येथून १८ आणि २५ मार्च रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी पुण्यासाठी सुटेल. ही ट्रेन दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर (पुण्याकडे येताना), कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, मानिकपुर, प्रयागराज चेओकी, पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्थानकावर थांबणार आहे.
पुणे-कानपूर विशेष एक्स्प्रेस
पुणे-कानपूर विशेष गाडी २० आणि २७ मार्च रोजी पुण्याहून सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. तर, कानपूर येथून २१ आणि २८ मार्च रोजी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी पुण्यासाठी सुटेल. ही ट्रेन दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, रानी कमलापति, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी जंक्शन आणि उरई या स्थानकावर थांबेल.