२२ यार्ड्स संघाचा दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:56+5:302021-03-26T04:11:56+5:30
पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट ...
पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत श्रेयस केळकर याने दोन्ही डावांत केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर २२ यार्ड्स संघाने श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब संघावर ३८८ धावांनी दणदणीत विजय मिळवत पाच गुणांची कमाई केली.
व्हिजन स्पोर्ट्स सेंटर, सिंहगड रोड येथील मैदानावर सुरू असलेल्या तीन दिवसीय लढतीच्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी २२ यार्ड्स संघाने दिवसअखेर ५३ षटकांत ३ बाद २६४ धावांवरून पुढे खेळताना रोहित कारंजकर (११७ चेंडूंत १९ चौकार व १ षटकारासह नाबाद १०२) आणि श्रेयस केळकर ( ९२ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह नाबाद १००) यांच्या कामगिरीच्या जोरावर ३०० चा टप्पा पार केला. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १३२ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली.
रोहित झेलबाद झाल्यानंतर श्रेयसने रणजीत मगर (२०) याच्या साथीत ३२ चेंडूंत ४० धावांची भागीदारी करून संघाला ६४.४ षटकात ६ बाद ३६८ धावांपर्यंत नेले. पहिल्या डावात १२९ धावांची आघाडी मिळविलेल्या २२ यार्ड्स संघाने ३६८ धावांवर डाव घोषित केला.
आव्हानाचा पाठलाग करताना श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब संघाचा डाव २७.१ षटकांत १०९ धावांवर संपुष्टात आला. यात रिषभ पारेख २६, अमय खरात १९, क्षितिज कबीर १९ यांनी झुंज दिली. २२ यार्ड्स संघाकडून आर्शीन देशमुख (३-९), नितीश सालेकर(३-६१), रोहित कारंजकर (२-१२) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. श्रेयस केळकर सामनावीर ठरला.
संक्षिप्त धावफलक :
पहिला दिवस : पहिला डाव : २२ यार्ड्स क्रिकेट अकादमी : ६१.२ षटकांत सर्वबाद ३५० धावा वि. श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब : ५४.३ षटकांत सर्वबाद २२१ धावा; २२ यार्डस संघाकडे पहिल्या डावात १२९ धावांची आघाडी;
दुसरा डाव : २२ यार्ड्स : ६४.४ षटकांत ६ बाद ३६८ धावा (डाव घोषित) रोहित कारंजकर १०८, श्रेयस केळकर नाबाद १००, नितीश सालेकर ६४, अमन मुल्ला २९, रणजीत मगर २०, क्षितिज कबीर - ३-५७ वि. श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब : २७.१ षटकांत सर्वबाद १०९ धावा. रिषभ पारेख २६, अमय खरात १९, क्षितिज कबीर १९, आर्शीन देशमुख ३-९, नितीश सालेकर ३-६१, रोहित कारंजकर २-१२.
फोटो - श्रेयस केळकर
-------------------------------------