पुण्याच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले नासाच्या उपग्रह निर्मितीचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 06:14 PM2018-05-25T18:14:57+5:302018-05-25T18:16:18+5:30
अमेरिकेतील नासा संस्थेने नुकतेच व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅण्ड येथून ‘इक्विसॅट’ या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे नेतृत्व हे पुण्याच्या आनंद ललवाणी या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले आहे.
पुणे : अमेरिकेतील नासा संस्थेने नुकतेच व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅण्ड येथून ‘इक्विसॅट’ या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे नेतृत्व हे पुण्याच्या आनंद ललवाणी या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले आहे. या पद्धतीने विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या आणि नासाने प्रक्षेपित केलेल्या अशा प्रकारच्या प्रकल्पातील गटाचे नेतृत्व केलेला तो पहिला भारतीय ठरला आहे. एका गिफ्ट बॉक्स इतकाच जवळजवळ ४ इंच एवढा या उपग्रहाचा आकार असून नासाच्या क्यूबसॅट लॉन्च इनिशिएटिव्ह अंतर्गत ब्राऊन स्पेस इंजिनिअरिंग अर्थात बीएसई या गटाने त्याची निर्मिती केली आहे. सोमवार दि २० मे, २०१८ रोजी सदर उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले असून गेल्या सात वर्षांपासून ब्राऊन युनिव्हार्सिटीचे विद्यार्थी या प्रकल्पावर काम करीत होते. विशेष म्हणजे एखाद्या उपग्रहाच्या निर्मितीसाठी किमान पन्नास हजार ते एक लाख डॉलर्स इतका खर्च येत असताना या विद्यार्थ्यांनी तो केवळ चार हजार डॉलर्स किमतीत विकसित केला आहे. या टीममध्ये पुण्याच्या आनंदने महत्वपूर्ण कामगिरी बजाविली आहे. त्याने नुकतीच ब्राऊन युनिव्हार्सिटीमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्स या विषयात पदवी पूर्ण केली आहे.
मूळचा पुण्यातल्या असणाऱ्या आनंदने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुळशी जवळील एका महाविद्यालयात ११वी,१२वी साठी प्रवेश घेतला. त्यावेळी एका त्याचा एक मित्र मुळशी जवळच्याच अस्ते नावाच्या गावात राहायचा. त्या गावात फक्त तीन ते चार तास लाईट असायची. गावातल्या लोकांचे आयुष्य जणू त्या चार तासांपुरते होते. हीच गोष्ट आनंदला खटकली आणि त्याने ऊर्जा क्षेत्रात काम करायचा निश्चय केला. या संपूर्ण कामासाठी त्या गावाची प्रेरणा असल्याचे तो आवर्जून नमूद करतो. मात्र आनंदला सौरऊर्जा विषयात विशेष आवड असून त्यातच पी एच डी करण्याची इच्छा आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात त्याचे कुटुंबीय राहतात. त्याचे वडील बांधकाम व्यावसायिक तर आई ज्वेलरी डिझायनर आहे. घरातून या संपूर्ण काळात प्रचंड सपोर्ट मिळाल्याचे आनंद आवर्जून सांगतो.तब्बल ९० लोकांपेक्षा मोठ्या टीममध्ये काम करताना खूप दडपण होत पण काम पूर्ण झाल्यावर समाधान मिळाल्याचे त्याने सांगितले.