मुलीवर अत्याचारप्रकरणी सावत्र बापाला २२ वर्षे सक्तमजुरी; १३ वर्षीय मुलीला आरोपीकडून पट्ट्यानेही मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:45 AM2024-03-27T10:45:46+5:302024-03-27T10:50:02+5:30
या प्रकरणी पीडितेच्या आईने आरोपीविरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना मे २०२० मध्ये थेरगाव परिसरात घडली....
पुणे : अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र नराधम बापाला बावीस वर्षांची सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. पीडित मुलगी, तिची आई, डॉक्टर व तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. विशेष न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी दिलेल्या या निकालामुळे अल्पवयीन पीडितेला न्याय मिळाला आहे.
या प्रकरणी पीडितेच्या आईने आरोपीविरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना मे २०२० मध्ये थेरगाव परिसरात घडली. घटनेच्या वेळी पीडिता सातवीत शिकत होती. तिची आई एका गृहनिर्माण सोसायटीत सफाई काम करायची. ती घरी नसताना सावत्र वडिलांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच, तिला पट्ट्याने मारहाण करत या प्रकाराची वाच्यता केल्यास आईसह तिला मारून टाकण्याची धमकी दिली. ही बाब समजताच पीडितेच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात बलात्कारासह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या विविध कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले.
या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर असून, त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ब्रह्मे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. सहायक पोलिस उपनिरीक्षक सपना देवतळे यांनी गुन्ह्याचा तपास केला. पोलिस कर्मचारी डी. एस. पांडुळे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.