राज्यातले २२० शिक्षक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:31+5:302020-11-22T09:39:31+5:30
पुणे : शाळा सुरू करण्यापूर्वी राज्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात १२ जिल्ह्यातले २२० शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे ...
पुणे : शाळा सुरू करण्यापूर्वी राज्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात १२ जिल्ह्यातले २२० शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाबाधित शिक्षकांची वाढती संख्या पाहता सद्यस्थितीत शाळा सुरु करणे उचित ठरेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी तर अद्याप घेतलेलीच नाही.
कोरोनामुळे सुमारे आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. शिक्षकांना आरोग्य तपासणीनंतरच शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि शिक्षण व आरोग्य विभागातर्फे १७ नोव्हेंबरपासून शिक्षकांची कोरोना चाचणी सुरु करण्यात आली.
या चाचण्यांमध्ये कोरोना बाधित शिक्षकांची संख्या दोनशेच्या पुढे गेल्याचे स्पष्ट झाले. सर्वाधिक ३५ कोरोना बाधित शिक्षक अकोला जिल्ह्यात आढळले. त्या खालोखाल सांगली व सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ३३ शिक्षक कोरोना बाधित सापडले. नागपूर जिल्ह्यात ३१, वाशिममध्ये ५, गडचिरोली जिल्ह्यात १५ ,नंदुरबारमध्ये १९, नांदेडमध्ये १२, जालन्यात ६, अमरावती जिल्ह्यात १२ तर कोल्हापुर जिल्ह्यात ९ कोरोनाबाधित शिक्षक आढळले. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १० आहे. शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शिक्षकांच्या कोरोना तपासणीचा अहवाल जमा केला जात आहे. येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत सर्व जिल्ह्यातील आकडेवारी प्राप्त होईल.
चौकट
चाचणी किती वेळा करायची?
सध्याच्या चाचणी मोहिमेत कोरोना निगेटीव्ह आली आणि शाळा सुरु झाल्यानंतर एखाद्याला संसर्ग झाला तर काय, असा प्रश्न शिक्षक आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे. त्या स्थितीत मग कितीवेळा कोरोना चाचणी करावी, या संदर्भातही शासनाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळेच कोरोनावरील खात्रीशीर लस येईपर्यंत शाळा सुरूच करु नयेत, असाही मतप्रवाह आहे.