2200 लघुपट आणि माहितीपटांचा दुर्मीळ ठेवा एनएफएआयच्या खजिन्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 04:11 PM2018-12-05T16:11:32+5:302018-12-05T16:14:25+5:30
जवळपास 60 ते 70 वर्षांपूर्वीच्या 16 एमएमच्या तब्बल 2200 लघुपटांसह माहितीपटाचा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे.
पुणे : राजा केळकर संग्रहालयावर 1950 च्या सुमारास झालेला माहितीपट, 'ललत' या संगीतावर आधारित नाविन्यपूर्ण चित्रपटासाठी पहिल्यांदा हिराबाई बडोदेकर तसेच त्यांच्या भगिनी सरस्वती राणे यांच्या आवाजातील साऊंड ट्रँकचा निर्माते पु.रा भिडे उर्फ स्वामी विज्ञानानंद यांनी केलेला खास वापर, कवी केशवसुत यांच्यावर तयार केलेला ‘कवींचा कवी केशवसुत’ लघुपट अशा साहित्य, इतिहास, संगीत, विज्ञान अशा विविध विषयांना वाहिलेल्या जवळपास 60 ते 70 वर्षांपूर्वीच्या 16 एमएमच्या तब्बल 2200 लघुपटांसह माहितीपटाचा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने रिळांमधील चित्रपट मिळण्याची ही पहिलीच घटना आहे !
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी या दुर्मीळ खजिन्याची माहिती दिली. या ठेव्यामध्ये देशविदेशातील लघुपटांसह माहितीपटाचा समावेश आहे. १९५० च्या सुमारास सुप्रसिद्ध लेखक आणि कवी रॉय किणीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सुमारे अर्ध्या तासाच्या रंगीत माहितीपटात राजा केळकर संग्रहालयातील अतिशय दुर्मीळ वस्तूंचे सुंदर दर्शन घडण्याबरोबरच लोकसभेचे पहिले सभापती जी. व्ही उर्फ दादासाहेब मावळकर, तत्कालीन केंद्रीय मंत्री न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ, पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त स. गो. बर्वे आदी मान्यवरांनी राजा केळकर संग्रहालयाला केळकर कुटुंबासमवेत दिलेल्या भेटींना या माहितीपटात उजाळा देण्यात आला आहे. जन्मशताब्दी सुरू असलेल्या पु.रा. भिडे उर्फ स्वामी विज्ञानानंद यांनी 'वंदे-मातरम' सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मितीही केली होती. ज्यामध्ये नायक-नायिकेची भूमिका महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांनी केली होती.
प्रख्यात कवी केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) १९६६ साली झालेल्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्यावर तयार करण्यात आलेल्या 'कवींचा कवी केशवसुत' या लघुपटाचाही या दुर्मीळ ठेव्यामध्ये समावेश आहे. बाळकृष्ण कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या पंधरा मिनिटांच्या या लघुपटाद्वारे प्रख्यात साहित्यिक आचार्य अत्रे यांनी लिहिलेली आणि प्रख्यात गायक सुधीर फडके यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली काही अनोखी गाणी ऐकण्याचा सुवर्णयोग या निमित्ताने जुळून आला आहे. १९७० मध्ये 'आॅरो फिल्म्स' च्या बॅनरखाली या दोन लघुपटांची निर्मिती करण्यात आली होती. पॉंडिचेरी येथील अरविंदो आश्रमात माताजी भक्तांना आशीर्वाद देत असल्याच्या प्रसंगासह आश्रमातील अनेक महत्वाच्या घटना या लघुपटांत चित्रित करण्यात आल्या आहेत. 'आजचे पुणे, सोलापूर, अहमदनगर' आणि 'आजचे सातारा, सांगली कोल्हापूर' या दोन माहितीपटांत पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांच्या काळात त्या त्या जिल्ह्यात झालेल्या विकासाचा सखोल माहितीपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. राज्य शासनानेही निर्मित केलेले माहितीपटही यात समाविष्ट आहेत.
'तंजावर' या सांस्कृतिक राजधानीची ओळख करून देणा-या चित्रपटाबरोबरच सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेल्या 'सावधान' या शैक्षणिक चित्रपटात 'रस्ते-सुरक्षा' या विषयावर माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.'रायटर्स आणि पोएट्स इन गुजरात' या दोन भागातील माहितीपटांत गुजरातमधील प्रसिद्ध लेखक उमाकांत जोशी, पन्नालाल पटेल, बालमुकंद दवे, यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. १९७८ मध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या माहितीपटांचे दिग्दर्शन वसंत जोशी यांनी केली