महापालिकेच्या २२ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
By admin | Published: October 22, 2016 03:58 AM2016-10-22T03:58:08+5:302016-10-22T03:58:08+5:30
महापालिकेच्या कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या करारानुसार पालिकेचे अधिकारी व कर्मचारी अशा २२ हजार जणांना ८.३३ टक्के बोनस व ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास
पुणे : महापालिकेच्या कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या करारानुसार पालिकेचे अधिकारी व कर्मचारी अशा २२ हजार जणांना ८.३३ टक्के बोनस व ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास मुख्य सभेने मान्यता दिली. मात्र दिवाळी ४ दिवसांवर आली असतानाही अद्याप त्याबाबतचे आदेश न निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शुक्रवारी पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश वितरीत करण्यात आले आहेत.
महापालिकेचे मुख्य विभाग, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शिक्षण मंडळ, बालवाडी शिक्षिका अशा सर्वांना बोनस व सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचे आदेश महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी काढले आहेत. या रकमा थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहेत. दिवाळी अगोदर बोनस हातात मिळणार असल्याने पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी झालेल्या मुख्य सभेत पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बोनसचे आदेश न काढल्याने प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार हे परदेश दौऱ्यावर असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही होऊ शकली नव्हती. याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मुख्य सभेने प्रशासनाला दिले होते.
(प्रतिनिधी)
चार दिवसांत जमा होणार बोनस
पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बोनस व सानुग्रह अनुदानाची बिले त्या त्या खात्यांकडून तयार होऊन ती वित्त विभागाकडे सादर केली जातील. त्यांच्याकडून त्याची तपासणी होऊन कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये बोनस जमा होणार आहे. यासाठी आणखी ३-४ दिवसांचा कालावधी लागेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.