अबब...! कोरोना संकटातही राज्यात 23 लाख दस्त नोंदणी; शासनाला सुमारे 34 हजार कोटींचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:55 PM2022-03-31T20:55:51+5:302022-03-31T20:55:57+5:30
कोरोनाचे संकट असतानाही राज्यात बांधकाम क्षेत्रात प्रचंड तेजी असल्याचे दस्त नोंदणीवरून स्पष्ट
पुणे : कोरोनाचे संकट असतानाही राज्यात बांधकाम क्षेत्रात प्रचंड तेजी असल्याचे दस्त नोंदणीवरून स्पष्ट झाले. सन 2021-22 या आर्थिक वर्षांत राज्यात तब्बल 23 लाख 70 हजार 408 दस्तांची नोंदणी झाली. यामधून शासनाला सुमारे 34000 कोटींचा महसूल मिळाला आहे.
कोरोना व लाॅकडाऊनमुळे राज्यातील दस्त नोंदणी काही महिने पूर्णपणे ठप्प झाली होती. याचा शासनाच्या महसुलावर प्रचंड मोठा परिणाम झाला. यामुळेच कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांची सवलत जाहीर केली. याचा चांगला परिणाम झाला व मंदीमध्ये असलेल्या बांधकाम क्षेत्राला चांगली उभारी मिळाली. गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या दस्त नोंदणीत भरघोस वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी होऊन 29 हजार कोटींचा महसूल शासनाला मिळाला होता. त्यावेळी कमी मुल्य असलेल्या व बक्षीस पत्रासारख्या व्यवहारामध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळेच दस्तांची संख्या अधिक असताना तुलनेत महसूल कमी होता. परंतु यंदा मोठ्या किमतीच्या, सर्वाधिक मुल्य असलेल्या दस्तांची संख्या वाढली असून, 23 लाख 70 हजार 408 दस्तांची गुरुवार (दि.31) मार्च पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी झाली होती. यामधून शासनाला सुमारे 34 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी सांगितला.