दहा शेतकऱ्यांना २३ लाखांची वीजबिल माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:16 AM2021-02-18T04:16:54+5:302021-02-18T04:16:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कृषिपंपाच्या वीजबिलांपोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी असताना कृषीपंप वीजजोडणी धोरणांतर्गत उरुळी कांचन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कृषिपंपाच्या वीजबिलांपोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी असताना कृषीपंप वीजजोडणी धोरणांतर्गत उरुळी कांचन परिसरातील १० कृषी ग्राहकांनी १८ लाख ५० हजार रुपयांचा भरणा केला. या शेतकऱ्यांनी नुकतीच थकबाकीमुक्ती मिळविली आहे.
मुळशी विभाग अंतर्गत उरुळी कांचन, कुंजीरवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबा या गावांतील १० कृषिपंपधारक शेतकरी व कृषीग्राहकांकडे वीजबिलांपोटी सुमारे ४१ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी होती. थकबाकीमुक्तीच्या योजनेतील सवलतीप्रमाणे या ग्राहकांनी साडेअठरा लाख रुपयांचे धनादेश उरुळी कांचन कार्यालयात जमा केले.
या वेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले उपस्थित होते. तालेवार यांच्या हस्ते थकबाकीमुक्त झालेल्या कृषी ग्राहकांचा गौरव करण्यात आला. “वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसोबतच गाव आणि जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या विकासाला वेग देणारी ही ऐतिहासिक योजना आहे. सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,” असे आवाहन तालेवार यांनी केले.
उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, के. डी. बापू कांचन, चंद्रलेखा रामराव जगताप, बापू घुले, श्रीदत्त सहकारी पाणीपुरवठा, म्हातोबा गौतम सहकारी पाणीपुरवठा योजनेचे पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. भरणा केलेल्या वीजबिलाच्या रकमेतील ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत क्षेत्र व ३३ टक्के रक्कम जिल्हा क्षेत्रातील वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
काय आहे योजना?
कृषी ग्राहकांच्या थकीत वीजबिलातील विलंब आकार, व्याज व मूळ थकबाकीत ५० टक्क्यांपर्यंत माफी देणारी योजना महावितरणने आणली आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.