पुणे जिल्ह्यात दूध भेसळ प्रकरणी पाच महिन्यात २३ लाखांचा मुद्देमाल जप्त ; १ लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:22 PM2018-11-20T12:22:32+5:302018-11-20T12:26:14+5:30
दूध व अन्न पदार्थात भेसळ करणा-या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा करण्यासंदर्भात प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
पुणे: पुणे विभागीय अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए)दूधात भेसळ केल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यात १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला असून १७ ठिकाणी जप्तीची कारवाई करून २३ लाख ४३ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात दूधात भेसळ करणा-यांना जन्मठेपेची शिक्षा करण्याबाबत कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात दूध भेसळीला चाप बसणार आहे.
दूध व अन्न पदार्थात भेसळ करणा-या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा करण्यासंदर्भात कायदा सुधारणा करण्याचा प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात दूधात भेसळ करून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दूध भेसळ तपासणीसाठी मोहीम राबविण्यात आली होती. पुणे विभागातील अन्न सुरक्षा अधिका-यांनी एप्रिल ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत दूध डेअरी,दूध संकलन केंद्र,दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन आदी ठिकाणांहून दूधाचे २५४ नमूने घेण्यात आले.त्यात ५२ दूधाचे नमूने अप्रमाणित तर १२४ प्रमाणित असल्याचे आढळून आले.तर उर्वरित नमून्यांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
एफडीएकडून पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे दूध भेसळीबाबत मोहीम राबविण्यात आली.त्यात एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिका-यांकडून घेण्यात आलेल्या नमून्यातून दूधामधील घटक पदार्थ तपासण्यात आले. त्यात युरीया,स्टार्च,सोयाबीन तेल,स्किमड् मिल्क पावडर आदीची भेसळ केली जात असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार दंडास पात्र असलेल्या प्रकरणात एफडीएकडून दंड करण्यात आला. त्यानुसार १ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.