३३ वर्षांत २३ आराखडे, तरीही पुण्याची ‘कोंडी’ सुटेना !
By admin | Published: October 1, 2015 01:00 AM2015-10-01T01:00:57+5:302015-10-01T01:00:57+5:30
पुण्याच्या वाहतूक समस्येवर आराखड्यावर आराखडे झाले. सल्लागारांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला. मात्र, वाहतूक सुधारणा काही झाली नाही.
सुनील राऊत , पुणे
पुण्याच्या वाहतूक समस्येवर आराखड्यावर आराखडे झाले. सल्लागारांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला. मात्र, वाहतूक सुधारणा काही झाली नाही. गेल्या ३३ वर्षांत तब्बल २३ आराखडे महापालिकेने केले आहेत.
मात्र, नव्याच्या नादात आपणच केलेल्या जुन्या उपाययोजनांचा विसर पडला आहे. गेल्या ३३ वर्षांत तब्बल २३ आराखडे तयार करण्यात आले. मात्र, त्यावर उपाययोजनाच झालेली नसल्याने वाहतूक समस्या जैसे थे राहिली आहे.
शहराची वाहतूक समस्या १९८0 च्या दशकात तुलनेने कमी होती. त्यानंतर पुढील वर्षात २००० पर्यंत शहरातील वाहनांनी ९ लाखांचा आकडाही गाठलेला नव्हता.
मात्र, भविष्यात शहराचा वाढणारा विस्तार आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन महापालिका तसेच राज्यशासनाने १९८१पासूनच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या त्या अंतर्गत १९८१ साली महापालिकेकडून सायकलींचे शहर असलेल्या पुण्यात सायकल मार्गाचे जाळे तयार करण्यासाठी सायकल नेटवर्क प्रोजेक्ट फॉर पुणे हा प्रकल्प हाती घेतला त्याचे काम नगररचना विभागाकडे देण्यात आले. २०००पर्यंतराज्यशासनाकडून तब्बल १२ वाहतूक नियोजनाचे आराखडे तयार करण्यात आले.
पुढे २००० ते २०११ पर्यंत शहरच्या विकासाचा वेग दरवर्षी तब्बल २५ टक्क्याहून अधिक होता. त्यामुळे २००१ मध्ये ९ लाखांवर पोहचलेली वाहनांची संख्या २०१२ मध्ये २३ लाखांच्या घरात जाऊन पोहचली.
मार्च २०१५ अखेर ही संख्या २६ लाखांच्या वर पोहचली आहे. ही वाहनांची वाढ लक्षात घेऊन महापालिकेने २००१ ते २०११ पर्यंत आणखी ११ वाहतूक नियोजन आराखडे तयार केले.