जुन्या बाजारातून २३२ कोयते जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 03:05 AM2019-01-31T03:05:22+5:302019-01-31T03:05:41+5:30
पाच जणांना अटक; सत्तूरही केले हस्तगत
पुणे : शहरात रस्त्यारस्त्यावर टोळ्याने फिरत अल्पवयीन मुलांसह गुन्हेगार छोट्या मोठ्या कारणावरुन एकमेकांच्या जीवावर उठल्याच्या घटना दररोज घडत आहेत़ कोयते धारक टोळक्यांची ही दहशत आणि खुनासाठी होत असलेला कोयत्यांचा वापर यामुळे जुन्या बाजारातील कोयते विक्रेत्यांवर काळ बनला आहे.
जुन्या बाजारातील पाच कोयते विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्याकडून २३२ कोयते व सत्तुर जप्त करण्यात आले आहेत़ जयसिंह शामराव पवार (वय ३४, रा़ मंगळवार पेठ), निलेश तानाजी साळुंखे (वय ३८, रा़ सोमवार पेठ), दिनेश सुखलाल साळुंखे (वय ४०, रा़ कसबा पेठ), फक्रुद्दिन जैनुद्दिन लोखंडवाला (वय ४२, रा़ रविवार पेठ) आणि कासीम नजमुद्दीन छावणीवाला (वय ४२, रा़ कॅम्प) अशी त्यांची नावे आहेत़ जुन्या बाजारात अनेक नव्या, जुन्या वस्तूंची विक्री होते़ शहरात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या टोळीयुद्ध व अन्य गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा सर्रास वापर झाला़ त्यापैकी काही आरोपींनी चौकशीत आपण जुन्या बाजारातून कोयते विकत घेतल्याचे सांगितले़ सहज उपलब्धता आणि कमी पैशात अशी हत्यारे मिळत असल्याने शहरातील छोट्या मोठ्या मारामारीत त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता़ कोयत्या गँग म्हणून काही जण प्रसिद्ध झाले होते.
याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले की, व्यावसायिक कामासाठी व शेती कामासाठी वापरण्यात येणारे कोयते हे गोलाकार असतात. आर्म अॅक्टनुसार ९ इंचापेक्षा अधिक लांबीचे हत्यार बाळगणे गुन्हा आहे.