जिल्ह्याची ग्रोथ सेंटर ठरणार १८ झोनमधील २३३ गावे; पीएमआरडीएचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 10:14 PM2021-08-02T22:14:26+5:302021-08-02T22:14:40+5:30
पीएमआरडीए प्रत्येक गावातील पाच किलोमीटरचा विकास करणार
पुणे : पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यात जिल्ह्यातील चारही बाजूच्या १८ झोनमधील २३३ गावांवर प्रामुख्याने फोकस केला आहे. हे १८ झोन जिल्ह्याची ग्रोथ सेंटर ठरणार आहेत. याठिकाणी मेट्रो, रिंगरोड, क्रिसेंट रेल्वे, क्रीडा विद्यापीठ, आयटी हब असे प्रामुख्याने महत्त्वाचे मोठे प्रकल्प पीएमआरडीएने प्रस्तावित केले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा ही १८ ठिकाणे ग्रोथ सेंटर ठरणार आहेत.
पीएमआरडीएने सादर केलेल्या प्रकल्पात ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ शैक्षणिक केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्याने, ८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने, ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र या महत्वाच्या प्रकल्पांचा देखील समावेश केला आहे.
---
कोठे काय होणार..
* चाकण येथे आटोमोबाईल हब आणि उपप्रादेशिक केंद्र
* आळंदी येथे नदीसुधार केंद्र
* वाघोली येथे उपप्रादेशिक केंद्र, आयटी हब
* लोणी काळभोर लाईफ सायन्स ॲन्ड स्मार्ट कृषी केंद्र
* खडकवासला येथे कम्युटर टाऊन (निवासी, व्यावसायिक व इतर सर्व प्रकल्प)
* पिरंगुट येथे नॉलेज हब
* हिंजवडी येथे उपप्रादेशिक केंद्र आणि आयटी हब
* तळेगाव येथे औद्योगिक ४.० हब
* मळवली येथे वेलनेस टुरिझम आणि शैक्षिण हब
* खेड (राजगुरूनगर) येथे कम्युटर टाऊन (निवासी, व्यावसायिक व इतर सर्व प्रकल्प)
* शिक्रापूर येथे लॉजिस्टिक आणि औद्योगिक हब
* उरूळी कांचन येथे ॲग्रो प्रोसेसिंग हब
* सासवड येथे एअरोट्रोपोलीस (हवाईजहाज केंद्र)
* खेड शिवापूर येथे ॲग्रो प्रोसेसिंग हब
* नसरापूर येथे हेरिटेज टुरिझम आणि शैक्षणिक केंद्र
* रांजणगाव येथे इंटिग्रेटेड (एकत्रित) निवासी केंद्र
* यवत येथे कम्युटर टाऊन (निवासी, व्यावसायिक व इतर सर्व प्रकल्प)
* केडगाव येथ कम्युटर टाऊन (निवासी, व्यावसायिक व इतर सर्व प्रकल्प)
----
प्रारूप आराखड्यांवर नोंदवा हरकती, सूचना
पीएमआरडीएने प्रारूप विकास आराखडा सोमवारी (दि. २) रोजी प्रसिद्ध केला आहे. कार्यक्षेत्रातील नागरिकांनी येत्या ३० दिवसांद आपल्या हरकती आणि सूचना नोंदवाव्यात, त्यासाठी pmr.dp.planning@gmail.com या मेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी केले आहे.
----
कोट
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र ६९१४.२६ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. मोठ्या प्रकल्पाबरोबर आम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये शेती, वन, वनीकरण, हिल टॉप हिल स्लोप, पर्यटन, ग्रीन बेल्ट वापर विभाग व रस्त्यांचे जाळे प्रस्तावित केले आहे. पुणे महापालिकेची हद्दवाढ केलेली असल्याने आम्ही फक्त २३ गावांचा विकास आराखडा तयार करून तो शासनाला सादर करणार आहोत.
- डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए