समुपदेशनामुळे २४ प्रकरणे काढली निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:41+5:302021-03-08T04:12:41+5:30
जेजुरी : येथील पोलीस ठाण्यात महिला दक्षात समितीच्या माध्यमातून कौटुंबिक वाद-विवाद, भांडण-तंटे त्याचबरोबर तरुणींना समुपदेशन करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी ...
जेजुरी : येथील पोलीस ठाण्यात महिला दक्षात समितीच्या माध्यमातून कौटुंबिक वाद-विवाद, भांडण-तंटे त्याचबरोबर तरुणींना समुपदेशन करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आली आहे. दोन वर्षांतील कोरोनाचा कालावधी वगळता समुपदेशनाने या समितीने २४ प्रकरणे निकाली काढली आहेत.
तीर्थक्षेत्र जेजुरीच्या पोलीस ठाण्यात ही शासनाने महिला दक्षता कमिटी स्थापन केलेली आहे. राजकीय, सामाजिक, कायदेविषयक, वैद्यकीय, शैक्षणिक सांस्कृतिक आदी क्षेत्रातील महिलांना या समितीचे सदस्य केलेले आहे. यामध्ये डॉ. शमा केंजळे, अमृता घोणे, डॉ. मीरा ताकवले, ॲड. विजया नाझीरकर, सुजाता जाधव, साधना दीडभाई, अंजली कांबळे, परवीन पानसरे, सुरेखा सोनवणे, रेखा चव्हाण, मंदा म्हस्के, अरुणा काकडे, मोहिनी धोत्रे, हेमा दरेकर, मालन झगडे, आनंदी यादव, शीतल चव्हाण, अश्विनी क्षीरसागर, पूनम वीरकर यांचा समावेश आहे.
जेजुरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुमारे ४२ गावे येत आहेत. गावांची संख्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या यात मोठी तफावत आहे. गावे, वाड्यावस्त्या जास्त आणि कर्मचारी कमी अशीच स्थिती जेजुरी पोलीस ठाण्याची आहे. एकीकडे कायदा व सुव्यवस्था राखतानाच जेजुरी तीर्थक्षेत्र असल्याने वेगवेगळ्या यात्रा, उत्सव यामुळे पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. यात महिलांचे प्रश्न अनेकदा प्रलंबित राहतात. अशावेळी महिला दक्षता समिती पोलिसांना खूप महत्त्वाची वाटते.
जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी दक्षता समितीतील महिलांचे मोठे योगदान असल्याचे जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचे म्हणणे आहे.
एखादे प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल झाले की दक्षता समितीकडून अन्यायग्रस्त महिलेसाठी बैठक घेऊन ते प्रकरण तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. इतरवेळी दर दोन महिन्यांतून एकदा दक्षता समितीची बैठक पोलीस ठाण्यात होत असतेच. गेल्या वर्षभरात कोरोना प्रादूर्भावामुळे या बैठकांना अडचणी आल्या आहेत. मात्र गरज असेल तेव्हा महिलांना दक्षता समितीने चांगले सहकार्यच केलेले आहे. गेल्या दोन वर्षांत २४ महिला अत्याचाराच्या बाबतची प्रकरणांचे निराकरण या समितीमार्फत झालेले आहे. काही प्रकरणे तालुका समन्वयकांकडे पाठवून योग्य ते मार्गदर्शन आणि न्याय मिळवून देण्यात या समितीला यश आलेले आहे. महिला दक्षता समितीबाबत महिलावर्गातून मोठे समाधान व्यक्त होत आहेत. हा कायदाच आता महिलांना हक्काचा वाटू लागला आहे. जेजुरीच्या दक्षता समितीबाबत परिसरातील महिलांतून समाधान ही व्यक्त होत आहे
महिलांमध्ये कायद्याबद्दलची जागृती करण्यासाठी घेतलेल्या कार्यशाळा असोत वा घरातील मतभेद मिटविण्यासाठी केलेले प्रयत्न समितीचे काम चांगले राहिले आहे. विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांमध्ये अपरिपक्व विचारांनी घरातून पळून जाणे, घरात न सांगता लग्न करणे वगैरे प्रकारात तर गुन्हा दाखल करण्यात येण्याच्या आधी पोलीस आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी केलेल्या समुपदेशनामुळे काही प्रकरणात तरी पुढची गुंतागुंत आणि कटूता टाळता आली.
डॉ. क्षमा केंजळे, सदस्या, जेजुरी महिला दक्षात समिती
०७जेजुरी केंजळे