राज्यातील २४ जिल्हे पाऊस नसल्याने कोरडेच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:43 AM2019-07-15T06:43:39+5:302019-07-15T06:43:51+5:30
पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे़
पुणे : पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे़ मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३१ टक्के, तर विदर्भात ३० टक्के कमी पाऊस झाला आहे़
पावसाअभावी या जिल्ह्यांतील पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात सध्या कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील भागात पाऊस आहे़ मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस आहे़ मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असली, तरी अहमदनगर (८ टक्के), पुणे (७५ टक्के), सातारा (२१ टक्के), कोल्हापूर (२६ टक्के) या जिल्ह्यांत जादा पावसाची नोंद झाली आहे़ सोलापूर (-५० टक्के), सांगली (-१५ टक्के) येथे पावसाची मोठी तूट आहे. उत्तर महाराष्ट्रात केवळ नाशिक जिल्ह्यात २१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून, नंदुरबार (- ३६ टक्के), जळगाव (-१७ टक्के), धुळे (-१६ टक्के) जिल्हे कोरडेच आहेत.
>पावसास सध्या अनुकूल स्थिती नाही
पश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नसल्याने मराठवाडा व विदर्भात सध्या मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती नाही़ त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील खरीप पेरण्योंवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे़
>मराठवाड्यात
३१ टक्के कमी पाऊस
मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैअखेर सरासरीपेक्षा तब्बल ३१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे़ हिंगोली (- ४६ टक्के) व नांदेड (- ४५ टक्के) जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पाऊस झाला असून, बीड (-३७ टक्के), परभणी (-३४ टक्के), उस्मानाबाद (-२६ टक्के), लातूर (-३२ टक्के), जालना (-१७ टक्के), औरंगाबाद (-८ टक्के) येथेही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़
विदर्भात ३० टक्के कमी
संपूर्ण विदर्भात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला़ यवतमाळ (-५१ टक्के), वर्धा (-४३ टक्के), वाशिम (-४१ टक्के), अमरावती (- ३९ टक्के), भंडारा (- ३१ टक्के), अकोला (- २८ टक्के), चंद्रपूर (-२३ टक्के), गोंदिया (-३७ टक्के), नागपूर (-२६ टक्के), गडचिरोली (- २० टक्के) जिल्ह्यांमध्ये पावसाची नितांत गरज आहे़ केवळ बुलडाणा (-३ टक्के) जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे़