पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर २४ तास गस्त सुरू ठेवावी, वाहनचालकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 11:23 AM2023-07-03T11:23:05+5:302023-07-03T11:24:52+5:30
महामार्ग पोलिस आणि आरटीओची पथके येथे सातत्याने कार्यरत असल्याने वाहनचालकांना शिस्त लागली होती...
पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील वाढत जाणारे अपघात रोखण्यासाठी, परिवहन विभागाकडून २४ तास गस्त ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु, ही मोहीम आता बंद करण्यात येत आहे. मात्र, ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवा, अशी मागणी वाहनचालकांकडून जोर धरत आहे.
परिवहन विभागाकडून राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांतील १२ पथकांमार्फत २४ तास गस्तीसाठी अॅक्शन प्लॅन तयार केला गेला होता. त्यानुसार विविध कार्यालयांतील पथके दोन्ही महामार्गावर गस्त घालत होती. त्यासाठी आराखडा बनवला होता. यामुळे परिवहन विभागाला अपघात रोखण्यास काही प्रमाणात यश आले होते. १ जुलैपासून ही २४ तास गस्तीची मोहीम परिवहन विभागाकडून बंद करण्यात आली आहे. परंतु, ही मोहीम नेहमीसाठी सुरूच ठेवावी, अशी मागणी होत आहे.
महामार्ग पोलिस आणि आरटीओची पथके येथे सातत्याने कार्यरत असल्याने वाहनचालकांना शिस्त लागली होती. ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवावी, असे वाहनचालक सिद्धेश वाघ, वाहनचालक यांनी म्हटले आहे.
पुणे-मुंबई जुन्या आणि नव्या महामार्गावर आरटीओच्या वायुवेग पथकांची २४ तास गस्त नसेल. मात्र, येथे पुणे, मुंबई, पनवेल आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक वायुवेग पथके कार्यरत केली जातील.
- भरत कळसकर, राज्य परिवहन उपायुक्त, रस्तासुरक्षा कक्ष, परिवहन विभाग