Ashadhi Wari: आळंदीत आषाढी वारीनिमित्त २४ तास पोलिसांचा खडा पहारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:39 AM2024-06-27T11:39:12+5:302024-06-27T11:39:41+5:30
वारीच्या काळात गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या चोरट्यांवर टॉवरवरून पोलीस लक्ष ठेवणार
आळंदी : श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरात पोलिस बंदोबस्त, पास व्यवस्था यांची तयारी सुरू आहे. शहरात प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. मंदिरात भाविकांना माऊलींच्या दर्शनाची व्यवस्था सुरू आहे. विशेषतः आषाढी वारीनिमित्त शहरात २४ तास सुमारे एक हजारांहून अधिक पोलिसांचा खडा पहारा तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथकांचाही समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.
आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून ५ सहायक पोलिस आयुक्त, २५ पोलिस निरीक्षक, १०८ पोलिस उपनिरीक्षक, ८५० अंमलदार, वाहतूक अंमलदार, होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच एसआरपीएफच्या २ कंपन्या, एनडीआरएफच्या २ तुकड्या, बीडीडीएसचे एक पथक मदतीला पाचारण करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अनाउन्सिंग सिस्टीमद्वारे भाविकांना सूचना मिळणार आहे. प्रस्थान सोहळ्यानिमित्त आलेल्या दिंड्यांच्या ठिकाणी पोलिस पेट्रोलिंग नेमण्यात येणार आहेत.
भाविकांच्या वाहनांकरिता व स्थानिकांच्या वाहनांकरिता वेगवेगळे पास तयार करण्यात आले आहेत. प्रस्थान सोहळ्यादरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची तुडुंब गर्दी असणार आहे. त्यामुळे स्थानिक व भाविकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणी लावावीत आणि ती ३० तारखेपर्यंत पुन्हा बाहेर काढू नये, अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, यात्राकाळात भाविकांची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. लोणीकंद - मरकळ - आळंदी रस्ता बंद असून भाविकांनी दिंड्यांची वाहने इतर पर्यायी मार्गाने आळंदीत आणावीत, असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे.
पालखी मार्गावर फेरीवाल्यांना बंदी
पालखी मार्गावर फेरीवाल्यांना बंदी घालण्याचे आदेश प्रभारी पोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणाहून पालखी जाणार आहे, त्या मार्गावर इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच पालखी मार्गावर कोणीही आपली वाहने पार्क करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी स्थानिक नागरिक व वाहन चालकांना केले आहे. मात्र या बंदीतून अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.
ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
वारीच्या काळात गर्दीचा गैरफायदा घेत अनेक चोरटे या गर्दीत मिसळून मोबाईल, पाकीट, सोन्याचे दागिने लंपास करतात. यामध्ये महिला चोरट्यांचाही सहभाग असतो. ही बाब लक्षात घेऊन साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलिस पालखीत असणार आहेत. एखादा संशयित दिसला की त्याला लगेच ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच परिसरातील रेकॉर्डवरील गुंडांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. वारीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी टॉवरवरून पोलिस गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत.