फ्रंटलाईन वर्कर्ससाठी २४ तास लसीकरण सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:42+5:302021-03-24T04:11:42+5:30
पुणे : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण अद्याप सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे अधिकारी कर्मचारी ...
पुणे : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण अद्याप सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे अधिकारी कर्मचारी झटत आहेत. त्यामुळे अनेकांचे लसीकरण राहिलेले आहे. या फ्रंटलाईन वर्कर्स तसेच वैद्यकीय सेवांसह इतर अत्यावश्यक सेवांची जबाबदारी असलेल्यांसाठी आता पालिकेकडून पाच केंद्रांवर २४ तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
शहरात रात्री ११ नंतर मर्यादीत संचारबंदी लागू केली असली तरी अत्यावश्यक सेवा आणि फ्रंटलाइन वर्कर यांना वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे या लसीकरण केंद्रावर रात्री जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचे अगरवाल यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांना ड्युटीपेक्षा पाच ते सहा तास अधिक काळ काम करावे लागत आहे. कोरोनाने उग्र रुप धारण केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आरोग्य सेवकांच्या लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली होती. तर, फँटलाईन वर्कर्सच्या लसीकरणास १ मार्चपासून सुरुवात केली आहे. लसीकरण केंद्रांची मर्यादीत संख्या आणि दैनंदिन काम यामुळे पालिका, पोलीस तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण कमी झाले आहे. सद्यःस्थितीमध्ये सुरू असलेल्या केंद्रांवर या कर्मचाऱ्यांसह, शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना लस मिळत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता रात्रीही लस देण्याची व्यवस्था केली आहे.