आळंदीत कार्तिकी यात्रेसाठी २४ तास पोलिसांचा कडक बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 07:18 PM2022-11-13T19:18:28+5:302022-11-13T19:18:40+5:30

शहरात पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी सुरु

24 hours police security for Kartiki Yatra in Alandi | आळंदीत कार्तिकी यात्रेसाठी २४ तास पोलिसांचा कडक बंदोबस्त

आळंदीत कार्तिकी यात्रेसाठी २४ तास पोलिसांचा कडक बंदोबस्त

googlenewsNext

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२६ वा संजीवन समाधी दिन सोहळा तथा कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. शहरात पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी सुरु आहे. शहरात प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. मंदिरात भाविकांना माऊलींच्या दर्शनाची व्यवस्था सुरु आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरात जंतुनाशक धुर फवारणी करण्यात येत आहे. देखभाल दुरुस्तीचे कामही पूर्णत्वास येत आहे. टाळ, पखवाज, फुल - प्रसादाची दुकाने गजबजली आहेत. शहरात ठिकठिकाणी दुकाने, तात्पुरती हाॅटेल्स उभारणी सुरु आहे. विशेषतः कार्तिकी यात्रेसाठी २४ तास सुमारे अडीच हजार पोलिसांचा खडा पहारा तैनात करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून ८ सहायक पोलीस आयुक्त, ५० पोलिस निरीक्षक, १९३ उपनिरीक्षक, १२५० अंमलदार, २५० वाहतूक अंमलदार, ६५० होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या २ तुकड्या, बीडीडीएसचे २ पथक मदतीला पाचारण करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात २३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. अनाउसिंग सिस्टीमद्वारे भाविकांना सुचना मिळणार आहे. यात्रेनिमित्त आलेल्या दिंड्यांच्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात येणार आहेत. सहा हाॅकर्स स्काॅड तैनात असणार आहे. 

भाविकांच्या वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा व स्थानिकांचे वाहनांकरिता गुलाबी रंगाचा असा वेगवेगळे पास तयार करण्यात आले आहेत. भाविक आणि स्थानिक नागरिकांना पाससाठी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करावा लागणार आहे. यात्रेदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची तुडुंब गर्दी असणार आहे. त्यामुळे स्थानिक व भाविकांनी आपली वाहने १९ तारखेच्या आत पार्किंगचे ठिकाणी लावावीत आणि ती पुन्हा बाहेर काढू नये अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, यात्राकाळात भाविकांची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. लोणीकंद - मरकळ - आळंदी रस्ता बंद असून भाविकांनी दिंड्यांची वाहने इतर पर्यायी मार्गाने आळंदीत आणावीत असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे.

Web Title: 24 hours police security for Kartiki Yatra in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.