जिल्ह्यात वर्षभरात २४ हजार सातबारे झाले दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:01+5:302021-08-15T04:13:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : गरीब, सर्वसामान्य नागरिकांसह भल्याभल्यांना सातबारा उताऱ्यात कधी नजरचुकीने, तर कधी जाणीवपूर्वक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे : गरीब, सर्वसामान्य नागरिकांसह भल्याभल्यांना सातबारा उताऱ्यात कधी नजरचुकीने, तर कधी जाणीवपूर्वक होणाऱ्या चुका वर्षानुवर्षे तापदायक ठरतात. अशा चुका दुरुस्त करण्याची खास तरतूद कायद्यात असतानादेखील महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून अशा चुका दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामध्ये ठराविक लोकांचे सातबारे दुरुस्त केले जातात. परंतु, पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी खास मोहीम घेऊन मोठ्याप्रमाणात सातबारा दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे आणले आहे. जिल्ह्यात आजअखेर केवळ १५ हजार ७८८ सातबाऱ्यांची दुरुस्ती शिल्लक राहिले आहे.
राज्यात सातबारा उतारा हा आजही मालमत्तेचा भक्कम पुरावा मानला जातो. परंतु याच सातबारा उताऱ्यात काही चुका असेल, तर संबंधितांना आयुष्यभर अडचण भासते. या सातबारा उतारा किंवा तत्सम मालमत्ता पत्रकांतील चुका दुरुस्तीची कायदेशीर तरतूद असतानाही त्या दुरुस्त्यांसाठी महसूल कर्मचारी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा अनुभव लोकांना येतो. जमिनीची किंमत किती? याचा हिशेब करून दुरुस्तीसाठी पैशांची मागणी करणे, पैसे न दिल्यास संबंधित कामे प्रलंबित ठेवणे असे प्रकार सर्रास होतात. परंतु, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर, सर्वांत प्रथम महसुली कामांना प्राधान्य दिले. यामुळेच गतवर्षी जिल्ह्यात तब्बल ३९ हजार ६२१ सातबारे दुरुस्तीसाठी महसूल प्रशासनाकडे प्रलंबित होते. देशमुख यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १८६६ चे कलम १५५ प्रमाणे सातबारा उतारा किंवा सिटी सर्व्हे रेकॉर्डमध्ये होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी खास मोहीम घेतली. यामुळेच गेल्या वर्षभरात सुमारे २३ हजार ८३३ सातबारे उतारे दुरुस्ती करण्यात आले. आता केवळ १५ हजार ७८८ सातबारे दुरुस्तीसाठी शिल्लक आहेत.
--------
सातबाऱ्यांच्या १५५ च्या दुरुस्तीकडे होते दुर्लक्ष
सातबारा उताऱ्यावर प्रशासनाकडून नजरचुकीने अथवा जाणीवपूर्वक झालेल्या चुका महसूल कायद्याच्या कलम १५५ नुसार करण्याचे अधिकार असतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. यासाठी विशेष मोहीम घेऊन या दुरुस्ती करण्यात आली. यामुळेच आजअखेर जिल्ह्यात केवळ साडेपंधार हजार सातबाऱ्यांची दुरुस्ती शिल्लक आहे.
- डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
-------
तालुकानिहाय दुरुस्तीसाठी शिल्लक सातबारे
हवेली ५०३३, पुणे शहर ७८, शिरूर ८८२, मावळ ११७७, मुळशी १४०७, खेड ८३२, बारामती १३२१, इंदापूर १६९३, दौंड ११३०, भोर ११९०, भोर ८६४, वेल्हा ८०, जुन्नर ३५, आंबेगाव ६६, एकूण १५,७८८
-------