काळाचा घाला! ड्युटीवर निघालेल्या २४ वर्षीय पोलिसाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 03:01 PM2021-10-31T15:01:20+5:302021-10-31T15:01:59+5:30
ड्युटीवर निघालेल्या तरूण पोलिसाचा मृत्यू झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला
बारामती : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्या नजिक झालेल्या अपघातामध्ये सोलापूर येथे ड्युटीवर निघालेल्या तरूण पोलिसाचामृत्यू झाला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला.
अक्षय बाळासाहेब साबळे (वय २४ वर्षे, राहणार नाशिक जिल्हा नाशिक, सध्या रा. सोलापूर) असे अपघातातमृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र अक्षय उर्फ मुकेश विजयकांत दुमडे (वय २३, राहणार सोलापूर) हा अपघातात गंभीर झाला आहे. पोलिस कर्मचारी अक्षय साबळे यांचे मित्र गॅरेज मेकॅनिक सिद्धेश्वर चंद्रशेखर हिरेमठ (रा. आसरा चौक, कल्यान नगर भाग १, सोलापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
गुरुवारी २८ ऑक्टोबरला दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील पोलीस अक्षय साबळे व त्याचा मित्र अक्षय उर्फ दुमडे हे दोघे सोलापूर येथे भेटले. यावेळी अक्षय साबळे यांचे मित्र अक्षय उर्फ मुकेश दुमडे याच्या मोटर सायकल वरून सोलापूर येथून बंदोबस्तासाठी जात असल्याचे सांगितले. ते दोघे सोलापूर येथून निघून गेले होते. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातून सिद्धेश्वर हिरेमठ यांना फोन आला.
तुमचा मित्र अक्षय साबळे व अक्षय उर्फ मुकेश विजयकांत दुमडे यांचा अपघात झाला आहे. त्यापैकी एकच मृत्यू झाला आहे. एकाला अपघातांमध्ये जबर मार लागला आहे. हिरेमठ व त्यांचे सहकारी मित्र आकाश तोगे, योगेश सरवदे, गंगाधर माळी, ते इंदापूर मध्ये सकाळी आठ वाजता पोहचले. अपघाताचा पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस करत आहेत.