पुणे विमानतळावर २४ वर्षीय महिलेचा राडा; महिलेवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:53 IST2023-03-13T13:53:46+5:302023-03-13T13:53:58+5:30
आरोपीने सीआयएसएफ इन्स्पेक्टरच्या शासकीय ड्रेसची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारली

पुणे विमानतळावर २४ वर्षीय महिलेचा राडा; महिलेवर गुन्हा दाखल
पुणे/किरण शिंदे: पुणे विमानतळावर कार्यरत असलेल्या महिला सी आय एस एफ निरीक्षक यांच्यावर महिलेने हल्ला केला आहे. ही सर्व घटना पुणे विमानतळावर १२ मार्च रोजी रात्री १२ वाजता घडली. याप्रकरणी पुणे विमानतळावर कार्यरत असणाऱ्या सी आय एस एफ इन्स्पेक्टर (निरीक्षक) रूपाली ठोके (३९) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या संदर्भात गुंजन अगरवाल (२४) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजन अगरवाल यांनी टॅक्सी मधून प्रवास करून विमानतळावर पोहचल्यावर त्यांनी टॅक्सी चालकाला पैसे देण्यास नकार दिला. टॅक्सी चालकाने एअरपोर्ट ऑथॉरिटी कडे मदत मागितली असता टर्मिनल मॅनेजर भक्ती लुल्ला यांनी गुंजन यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लुल्ला यांना शिवीगाळ केली तसेच विमानतळ प्रस्थान (departure) गेट क्रमांक १ वर रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये जाऊन गोंधळ घातला.
हा सगळा प्रकार जेव्हा विमानतळावर सुरक्षतेसाठी कार्यरत असलेल्या महिला निरीक्षक रूपाली ठीके यांना निदर्शनास आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी अगरवाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी यांनी त्यांचे एक न ऐकता अगरवाल यांनी फिर्यादी यांची शासकीय ड्रेसची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारली. इतक्यावर न थांबता आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली. सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.