जिल्ह्यातील २४ हजार शेतकरी ‘आधार’ पासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 10:30 PM2020-01-07T22:30:00+5:302020-01-07T22:30:01+5:30
आधी बँक खाते आधार लिंक करा; नंतरच कर्ज माफीसाठी पात्र ठरला..
पुणे : राज्य शासनाच्या शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील अद्यापही तब्बल २४ हजार पेक्षा अधिक शेतकचे बँक खाते आधार लिंक नसल्याचे समोर आले आहे. या सर्व शेतक-यांना आधी बँक खाते आधार लिंक करा , त्यानंतरच शेतक-यांना कर्ज माफीसाठीचा अर्ज भरता येणार आहे. यामुळे शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची बँक खाती आधार लिंक करण्यासाठी सहकार्य करण्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व संबंधित बँकांना दिले आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाशिव आघाडी सरकारने शेतक-यांसाठी ‘महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना’ जाहिर केली आहे. शासनाने शेतक-यांना कर्ज माफी जाहिर करताना अनेक अटी घातल्या आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाची अट कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना आपले बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला केवळ २ लाख रुपयापर्यंत कर्ज माफी देण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ९२ हजार १३४ शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी २ लाख प्रमाणे कर्जमाफी देण्यासाठी १ हजार ८४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. परंतु यासाठी सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक आहे. शेतक-यांचे बँक खाती आधार लिंक करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि बँक प्रतिनिधीची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँकांनी खास शिबिरांचे आयोजन करुन लवकरात लवकर शिल्लक राहिलेल्या शेतक-यांची बँक खाते आधार लिंक करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत.