बारामती उपविभागातील २४ हजार हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:41+5:302021-03-19T04:09:41+5:30
बारामती: पुणे जिल्ह्यात बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात भौगोलिक दृष्ट्या पर्जन्यकाळात अत्यल्प पाऊस पडतो. या चारही तालुक्यांतील ...
बारामती: पुणे जिल्ह्यात बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात भौगोलिक दृष्ट्या पर्जन्यकाळात अत्यल्प पाऊस पडतो. या चारही तालुक्यांतील शेतकऱ्यांना नदी, कालवे व विहिरींच्या पाण्याच्या भरवशावरच शेती पिकवावी लागते. मात्र, केंद्र सरकारने प्रधानमंत्री सिंचन योजना कार्यान्वित केल्यामुळे बारामती उपविभागातील सुमारे ३६ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असून,२४ हजार हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
शेतकऱ्यांची जोखीम कमी करून शेती व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर व्हावा, तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था आवश्यक बनल्याने सन २०१५-१६ पासून केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता करणे व पाण्याची कार्यक्षमता वाढवून अधिकाधिक पीक उत्पादन मिळवणे. या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांत पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविली जात आहे. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होत आहे. या योजनेअंतर्गत उन्हाळा अधिक कडक असल्यास शेती थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी तुषार सिंचन वापरली जाते. तर ऊस आणि फळबागांना ठिबक सिंचन पद्धतीने वापर केला जातो. मात्र शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच असणे गरजेचे आहे. सदर योजनेपूर्वी अनेक शेतकरी पाट पद्धतीने शेतीला पाणी देत असे. त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर व्हायचा. शिवाय अपेक्षित उत्पादनही हाती येत नसे, मात्र या योजनेचा लाभ घेतल्यामुळे पाणी, खते व मजूर खर्चात शेतकऱ्यांची मोठी बचत होत असून अपेक्षे पेक्षा अधिक उत्पादन मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
या शेतक-र्यांना मिळते अनुदान
· अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – ५५ टक्के
· इतर शेतकरी – ४५ टक्के
......................
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा आलेख
तालुका शेतकरी सिंचन क्षेत्र
· बारामती - ११८६१ - ७९७६.७२
· दौंड - ६४४२ - ४२८८.२१
· इंदापूर - १४३८२ - १००१६.४१
·. सासवड - ३४७७ - १९३०.९७
......................
बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, सासवड या तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून,२४ हजार हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या कृषी सिंचन योजनेचा अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदानाचा लाभ मिळत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
--- बालाजी ताटे उपविभागीय अधिकारी बारामती.
सिंचन योजनेची उद्दिष्टे......
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करणे.
जल वापर कार्यक्षमतेत वाढ करणे.
कृषी उत्पन्नासह शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करणे.
कुशल व अर्ध कुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
समन्वयीत पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे.