लाॅकडाऊनचा फटका बसलेल्यांना जिल्ह्यात २४ हजार टन धान्य मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:16+5:302021-05-21T04:11:16+5:30
पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनचा फटका बसलेल्या गरीब लोकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने केंद्राप्रमाणे मोफत धान्य वाटपाचा निर्णय ...
पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनचा फटका बसलेल्या गरीब लोकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने केंद्राप्रमाणे मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ६१ टक्के लाभार्थ्यांना तब्बल २४ हजार ६१ टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
राज्य शासनाकडून मे महिन्यासाठी ७७५६.४६ टन गहू व ४९३५.८८ टन तांदूळ असे एकूण १२६९२.३४ टन अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. आज अखेर राज्य शासनाकडून प्राप्त अन्नधान्याचे ६१.३३ टक्के वाटप झाले. तसेच केंद्र शासनाकडून मे महिन्यासाठी आलेल्या ६८२१.४४ टन गहू व ४५४८.१४ टन तांदूळ असे एकूण ११३६९.५८ टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. आज अखेर केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्याचे ५६.९७ टक्के वाटप झाले आहे.
राज्य व केंद्र शासनाकडून आलेल्या अन्नधान्याचे १८ मेपर्यंत २४०६१.९२ टन अन्नधान्य जिल्ह्यात मोफत वाटण्यात आले. तसेच उर्वरीत लाभार्थ्यांना महिना अखेरपर्यंत १०० टक्के अन्नधान्य वितरण करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी सांगितले.
अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना १ महिन्याकरीता मोफत गहू व तांदूळ वाटपाबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच २६ एप्रिल २०२१ च्या केंद्राच्या आदेशानुसार मे व जूनसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमहिना ५ किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.