इंदापुर तालुक्यात गायीच्या पोटात निघाल्या तब्बल २५ ते ३० किलो प्लास्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:30 PM2018-08-10T18:30:26+5:302018-08-10T18:36:00+5:30
इंदापूर तालुक्यातील शहा गावी सलग ३ तास शस्त्रक्रिया करुन गायीच्या पोटातील हे प्लास्टिक बाहेर काढले.
बाभुळगाव :प्लास्टिकचा भस्मासूर किती भयानक होता, याचा प्रत्यय शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील शहा गावी आला. येथील धनाजी इजगुडे यांच्या गाईच्या पोटात तब्बल २५ ते ३0 किलो प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्या. त्यांच्या गायीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर हा प्रकार उघडकीस आला. डॉ.लक्ष्मण आसबे यांनी सलग ३ तास शस्त्रक्रिया करुन गायीच्या पोटातील हे प्लास्टिक बाहेर काढले. शेतकरी इजगुडे यांनी काही दिवसांपूर्वीच ही गाय बाजारातून विकत आणली आहे. मात्र, ती आजारी पडली. डॉक्टरांनी गायीची तपासणी केली. यात पोटात काहीतरी असल्याची शक्यता वर्तवली होती.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गायीच्या पोटातक प्लास्टिकसारखा तत्सम पदार्थ असावा असा संशय होता. तातडीने शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. तब्बल ३ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तब्बल २५ ते ३० किलो प्लास्टिक पोटातून काढण्यात आले. एका मुक्या जनावराचा जीव वाचवण्याचा आनंदही आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या गायीची काळजी घ्यावी, जनावरे माती,प्लास्टिक, कागद आणि कपडे खात असतील तर त्यांच्या शरीरात ‘ मिनरल्स’ची कमतरता आहे, असे शेतकऱ्यांनी समाजावे. त्यासाठी मिनरल्स मिक्स्चर हे औषध जनावरांना नेहमी चारावे ,असे डॉ. आसबे म्हणाले.
हा विषय आज परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील प्लास्टिक वापराचे गंभीर परिणाम अनुभवयास मिळत आहेत. अनेक जनावरांच्या पोटात प्लास्टिक पिशव्या असण्याची भीती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
............................
शेतकरी आपल्या काही वस्तू कॅरीबॅगमध्ये बांधून त्या रस्त्यात टाकतात. त्यात काही वेळा शिळे अन्न असते. ते या गायीच्या तोंडाला लागल्यास ते त्या खातात. मात्र या मुळे गायींची मानसिकता अशीच होते की, प्रत्येक कॅरिबॅगमध्ये अन्नच आहे. त्या मुळे गायी कॅरिबॅगच खातात. पण गाईंनी खाल्लेली कॅरिबॅग तिच्या पोटात विरघळत नाहीत. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या शस्त्रक्रियेशिवाय निघूच शकत नाही. विशेष म्हणजे या पिशव्या गायीच्या पोटात विरघळवण्याचे कोणतेही रसायन अजूनपर्यंत तयार झाले नाही. त्यामुळे अशा वस्तु जनावरांपासून लांब टाकाव्यात.
डॉ. लक्ष्मण आसबे, पशुवैद्यकीय डॉक्टर