विमानतळासाठी २५ एकर जागा लवकरच - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:55 AM2018-01-31T03:55:13+5:302018-01-31T03:55:29+5:30
लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण तसेच विमानतळावरील विविध सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन हस्तांतर प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे विमानतळासाठी आवश्यक जागेचा मुद्दा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
पुणे : लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण तसेच विमानतळावरील विविध सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन हस्तांतर प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे विमानतळासाठी आवश्यक जागेचा मुद्दा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये मंगळवारी पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. या बैठकीला गडकरी यांच्यासोबत खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद महापात्रा, लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार, एस. विश्वास, संरक्षण खात्याचे अतिरिक्त सचिव बरून मित्रा तसेच हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते.
लोहगाव विमानतळाशी संबंधित विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. लोहगाव विमानतळावरील प्रवाशांची संख्या तीन वर्षांत
दुपटीने वाढली आहे. त्या तुलनेत जागेअभावी विविध सुविधांची कमतरता आहे, तर अपुºया धावपट्टीअभावी आंतरराष्ट्रीय उड्डाणांनाही मर्यादा आहे. त्यामुळे विमानतळाकडून अतिरिक्त जागेची मागणी होत होती. त्यावर पायाभूत समितीच्या बैठकीत चर्चा झाली.
शिरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरी यांनी पालकमंत्री बापट यांना राज्य शासनातर्फे २५ एकर जमीन हस्तांतर प्रक्रिया तातडीने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण आणि विमानांची उड्डाणसंख्या वाढ हे
दोन मुद्दे लोहगाव विमानतळाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याने त्यावर संरक्षण खात्याने
कार्यवाही करावी, असेदेखील गडकरी यांनी नमूद केले.
लोहगाव विमानतळ येथील कार्गो सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक असलेली हवाई दलाच्या वापरात नसलेली जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करणे, तसेच विमाननगर ते लोहगाव विमानतळ तसेच पुढे विकफिल्ड चौक हा रस्ता तयार करण्यासाठी महानगरपालिका, विमानतळ प्राधिकरण, तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी ह्यांची संयुक्त बैठक तातडीने बोलाविण्याची सूचना गडकरी यांनी केल्याचे शिरोळे यांनी सांगितले.
विस्तारीकरणाचा प्रश्न कायम
1 विमानतळाच्या विस्तारासाठी भारतीय वायू दलाने १५ एकर जमिनीची मागणी केली असली तरी काही अडचणींमुळे ही जमीन हस्तांतरित करणे सध्या शक्य नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे विविध पर्याय दिले आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न कायम आहे.
2लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. जागेअभावी प्रशस्त वाहनतळ, नागरी सोयी-सुविधा, विमाने ठेवण्याची जागा आदी पायाभूत सुविधांसाठी १५ एकर जागा दिली जावी, अशी मागणी भारतीय वायू दलाकडून केली जात आहे. मात्र, विमानतळाकडे उपलब्ध असलेल्या ५७ एकर जागांपैकी सुमारे २२ एकर जागेवर सध्या विमानातळ उभे आहे.
3तरीही वायू दलाकडून नवीन जागेची मागणी केली जात आहे. त्यातच गेल्या काही कालावधीपासून लोहगाव विमानतळावर हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. रात्री बारा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत ‘रेड आय फ्लाईट्स’ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाचा विकास करण्याची आवश्यकता असल्याची मागणी समोर आली आहे, याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पूर्वेकडील बाजूप्रमाणे विमानतळाच्या पश्चिमेकडेही खासगी मालकीची जमीन आहे. तसेच हवाई दलाने सर्व्हे क्रमांक २४८/१ याच जागेची मागणी केली आहे. परंतु, त्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.
त्याचप्रमाणे संबंधित जागेचा मोबदला देण्यासाठी सर्व्हे क्र. एक्स्झमटेझ प्लॅन (ईपी) समाविष्ट करावा, अशी मागणी नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे, असेही राव म्हणाले.
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी पश्चिमेकडील एक खासगी जागा उपलब्ध असून भारतीय वायू दलाला हवी आहे. मात्र, जागामालकाने याविरोधात न्यायालयात धाव घेतली. तसेच विमानतळाकडे पूर्वेकडील बाजूस मुबलक जागा उपलब्ध असूनही पश्चिमेकडील जागा का हवी आहे? असा सवाल त्याने उपस्थित केला. मात्र, पश्चिमेकडे लोकवस्ती वाढल्याने या बाजूस धावपट्टी वाढवणे योग्य होणार नाही. तसे केल्यास विमानतळावर विमान उतरण्यास व उड्डाणास अडचण येऊ शकते. त्यामुळे वायू दलाने १५ एकर जमिनीची मागणी केली आहे.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी