शिक्रापूरला २५ लाखांचे मांडूळ तस्करांकडून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:24+5:302021-05-19T04:11:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव भीमा : शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांच्या पथकाने कोरेगाव भीमानजीक वाडागाव परिसरात कारवाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांच्या पथकाने कोरेगाव भीमानजीक वाडागाव परिसरात कारवाई करून दोघा युवकांकडून तस्करीसाठी नेले जाणारे तब्बल २५ लाख रुपये किमतीचे दुर्मिळ मांडूळ जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद अजितराव साळुंके व सागर गजानन जाधव असे अटक करण्यात आलेल्या युवकांचे नाव आहे. वाडागाव (ता. शिरूर) येथे दोघा युवकांनी मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस शिपाई बापूसाहेब हाडगळे, लक्ष्मण शिरसकर, विकास पाटील यांनी वाडागाव परिसरात सापळा लावला. आरोपी दुचाकीवरून येताना पोलिसांना दिसले. त्यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची तपासणी केली असता, पिशवीत दोन मांडूळ आडळले. पोलिसांनी मांडूळ व दुचाकी जप्त केली. मांडूळ शिरूर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.
फोटो : शिक्रापूर, ता. शिरूर पोलिसांनी जप्त केलेला पंचवीस लाख रुपये किमतीचा दुर्मिळ मांडूळ जातीचा साप.