कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना २५ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:02+5:302021-01-14T04:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आपत्तीत सेवा बजावत असताना, कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या महापालिकेतील सेवकांच्या वारसांना प्रत्येकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीत सेवा बजावत असताना, कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या महापालिकेतील सेवकांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला.
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना आपत्ती निवारणासाठी काम करताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिकेच्या कर्मचारी वर्गाकरिता महापालिकेने ५० लाख रुपयांचा विमा देऊ केला होता. यात जर मृत सेवकांच्या वारसास नोकरी हवी असल्यास नोकरी व २५ लाख रुपये असा पर्याय होता.
कोरोना आपत्तीत शासनाने लागू केलेली विमा योजना केवळ सप्टेंबर,२०२० पर्यंतच लागू होती. ती अट शिथिल करीत महापालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्वच काळातील कर्मचाऱ्यांकरिता ही योजना लागू केली होती. त्यानुसार आता महापालिकेच्या ४४ दिवंगत सेवकांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपये व महापालिका सेवेत नोकरी देण्यात येणार आहे.
-----