निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीना २५ लाख : आमदार संजय जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 03:44 PM2023-10-24T15:44:37+5:302023-10-24T15:54:21+5:30
पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे....
सासवड : पुरंदर-हवेली मतदारसंघातील बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना महाविकास आघाडीतील घटक असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या खासदार व आमदार फंडातून प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी जाहीर केले आहे.
गावातील नागरिकांत एकोपा निर्माण व्हावा, टिकावा तसेच निवडणुकीवर होणाऱ्या खर्चामध्ये बचत व्हावी या उद्देशाने खा. सुप्रियाताई सुळे व आ. संजय चंदूकाका जगताप यांनी हा निर्णय घेतला असून, याबाबत आ. संजय जगताप यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या काळात मुदत संपलेल्या ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवेळीही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून देण्याबाबत खा. सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांनी आवाहन केले होते. त्यावेळी पुरंदर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींनी यास प्रतिसाद देत या निवडणूका बिनविरोध केल्या होत्या.
दरम्यान, पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये दि. २३ रोजी छाननी, तर दि. २५ रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, चिन्हवाटप करण्यात येणार आहे, तर दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान आणि दि. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक होणाऱ्या १५ ग्रामपंचायती : माळशिरस, वीर, गुळूंचे, एखतपूर - मुंजवडी, राजुरी, वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, कर्नलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, वाल्हे, कोथळे आणि रानमळा.