पाच महिन्यांत २५ पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू : पादचारी धोरण कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:00 AM2019-06-14T07:00:00+5:302019-06-14T07:00:02+5:30
महापालिका, वाहतूक पोलिसांचे पादचाऱ्यांकडे दुर्लक्ष, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी सर्वच स्तरावर असलेली अनास्था, तसेच पादचाऱ्यांकडून वाहनांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहरातील पादचारी असुरक्षित झाले आहेत़...
- विवेक भुसे
पुणे : रस्ते रुंद झाले, वाहनांची संख्या आणि वेगही वाढला़. त्याबरोबर ठराविक भागात पदपथ प्रशस्त झाले़ तरीही एकूणच शहराच्या वाहतूक व्यवस्थेत पादचारी दुर्लक्षित राहिला असून गेल्या पाच महिन्यात २५ पादचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे़.
पुणे महापालिकेने पादचारी धोरण तयार केले़. तसेच अर्बन स्ट्रिट डिझाईनच्या मार्गदर्शन सूचना तयार केल्या़ असे धोरण तयार करणारी देशातील पहिली महापालिका म्हणून स्वत:चा गौरव करुन घेतला़. पण, या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणीत केली जात नसल्याने अजूनही पादचारी दुर्लक्षित राहिला आहे़.
महापालिका, वाहतूक पोलिसांचे पादचाऱ्यांकडे दुर्लक्ष, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी सर्वच स्तरावर असलेली अनास्था, तसेच पादचाऱ्यांकडून वाहनांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहरातील पादचारी असुरक्षित झाले आहेत़.
पादचाऱ्यांच्या झालेल्या या अपघातात प्रामुख्याने रस्ता ओलांडताना वेगाने आलेल्या वाहनांने दिलेली धडक आणि पाठीमागून आलेल्या वाहनांनी पादचाऱ्यांना दिलेली धडक या दोन कारणांमुळे प्रामुख्याने अपघात होत आहे़.
गेल्या पाच महिन्यात शहरात झालेल्या ८३ अपघातात एकूण ८६ जणांना आपला जीव गमवावा लागला़. त्यात सर्वाधिक २५ पादचाऱ्यांचा समावेश आहे़ किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या त्यातून किती तरी अधिक आहे़.
याबाबत पादचारी प्रथमचे प्रशांत इनामदार यांनी सांगितले की, महापालिकेने पादचारी धोरण तयार केले़. अर्बन स्ट्रिट डिझाईनबाबत गाईडलाईन तयार केल्या़. ज्या गांभीर्याने या समितीने ३ वर्षे झटून हे धोरण तयार केले़. मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष करत महापालिकेनी त्याची अंमलबजावणी केली नाही़. शहराच्या ठराविक रस्त्यांवर प्रशस्त फुटपाथ तयार झाले़. पण, त्याच्यावर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्यात येत नाही़. फुटपाथ बांधल्यानंतर आपली जबाबदारी संपली असे महापालिकेला वाटते, तर अतिक्रमण हे आपले काम नसल्याचे पोलिसांचा समज आहे़. त्यामुळे दोन्ही यंत्रणा याची जबाबदारी घेत नसल्याने पादचारी पुन्हा वाऱ्यावरच राहिला आहे़.
महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईत सातत्य दिसून येत नाही़. त्यामुळे फुटपाथवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होताना दिसते़ सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीजचे होऊन जाते़.
वाहतूक शाखेकडून पादचारी मार्गावर वाहन पार्क केले असेल तर त्यांच्यावर महापालिका कायद्यानुसार १ हजार रुपये दंडाची कारवाई केली जाते़. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी चौकातील वाहतूक पोलीस हे अनेकदा ज्येष्ठांना मदत करीत असतात़. शहरातील वाहनांची संख्याच इतकी वेगाने वाढत आहे की, त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्याकडे वाहतूक पोलिसांना सर्वप्रथम लक्ष द्यावे लागत असल्याचे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़
.........
पादचारी सिग्नल न पाळण्याची वृत्ती
शहरातील रस्त्यांवर वाहनांबरोबरच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी सिग्नलमध्ये वेळ दिलेला असतो़. पण, अपवाद वगळता तो कोणीही पाळताना दिसत नाही़. अनेक ठिकाणी तर चौकातील वाहतूक पोलीस पादचाऱ्यांसाठी असलेल्या या वेळेत वाहने पुढे जाण्यास सांगतात़ वाहनांना पुढे पाठवून चौक मोकळा करण्याकडे वाहतूक पोलीस महत्व देताना दिसतात़ .
़़़़़़़़़़़़़
शहरात सुमारे २२०० किमीचे छोटे मोठे रस्ते असून त्यापैकी जवळपास निम्म्या म्हणजे एक हजार किमी रस्त्यांना फुटपाथ आहेत़. मात्र, हे फुटपाथ व्यवस्थित राहतील़ त्याची निगराणी केली जाते की नाही, हे पाहण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही़. ही आपली जबाबदारी आहे, असे महापालिकेला वाटत नाही़.
़़़़़़़़...
पादचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी
* पादचारीही रस्त्यावरुन निष्काळजीपणे जाताना दिसतात़ अनेकदा ते कोठूनही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात़. शहरात अनेक ठिकाणी पादचारी पुल बांधण्यात आले असले तरी त्याचा वापर न करता शॉटकट म्हणून रस्त्याच्या दुभाजकामधील रेलिंगमधून रस्ता ओलांडतात़.
* ज्या चौकात सिग्नल आहे़. त्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नल सुरु होईलपर्यंत वाट पाहा़
* जेथे फुटपाथ आहे, तेथे शक्यतो फुटपाथचा वापर करावा़.
* ज्या रस्त्यावर फुटपाथ नाही, त्या रस्त्याच्या कडेने चालताना वाहनांच्या विरुद्ध दिशेने चालावे. जेणे करुन समोरुन येणारी वाहने पाहणे शक्य होईल व पाठीमागून कोणतेही वाहन येऊन धडकणार नाही़.
महिना पादचारी मृत्यु
जानेवारी ४
फेब्रुवारी ५
मार्च ८
एप्रिल ३
मे ५
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
एकूण २५
़़़़़़़़़़़
पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता आला पाहिजे ही महापालिका आणि वाहतूक पोलिसांची संयुक्तिक जबाबदारी आहे़.पादचारीच चुकीचे ही मानसिकता बदलण्याची गरज आहे़. सकाळी, सायंकाळी फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड या प्रशस्त फुटपाथ झालेल्या रस्त्यावरुन तसेच बाजीराव रोड सारख्या मध्य वस्तीच्या रस्त्यावरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: चालत जाऊन पाहणी केली. तर पादचारी कसे मुठीत जीव घेऊन रस्ता ओलांडतात, हे लक्षात येईल़. वाहतूक नियोजनात पादचारी हा महत्वाचा घटक आहे, त्याचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे़.
प्रशांत इनामदार, पादचारी प्रथम