Railway: पुणे रेल्वे विभागात एका महिन्यात तब्बल २५ हजार फुकटे; २ कोटींपेक्षा जास्त दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:47 AM2023-07-04T11:47:29+5:302023-07-04T11:48:33+5:30
प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा; अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवास होऊ शकतो, असे आवाहन पुणे रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे...
पुणे : पुणेरेल्वे विभागात जून महिन्यामध्ये तिकीट तपासणीदरम्यान २५ हजार ३७७ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी १४ लाख ६१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच ८ हजार ४७७ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ५० लाख ९५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १६४ जणांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू राणी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा; अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवास होऊ शकतो, असे आवाहन पुणे रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.