२५ हजार किमी प्रवास दुचाकीवरून
By admin | Published: May 9, 2015 03:15 AM2015-05-09T03:15:45+5:302015-05-09T03:15:45+5:30
नियोजन, जिद्द, चिकाटी आणि अपूर्व मनोबलाच्या जोरावर वेगळं काही तरी करून दाखविण्याच्या ऊर्मीने सात राष्ट्रांचा दौरा, तोसुद्धा चक्क दुचाकीवर पूर्ण केला
पिंपरी : नियोजन, जिद्द, चिकाटी आणि अपूर्व मनोबलाच्या जोरावर वेगळं काही तरी करून दाखविण्याच्या ऊर्मीने सात राष्ट्रांचा दौरा, तोसुद्धा चक्क दुचाकीवर पूर्ण केला. सुखद, काही कटू अनुभव घेत, अडचणींवर मात करीत २५ हजार किलोमीटरचा प्रवास दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण करू शकलो, याचा मनस्वी आनंद वाटतो. हा अनुभव संस्मरणीय ठरणारा आहे. अशा भावना निगडी प्राधिकरण येथील राहुल देशमुख यांनी व्यक्त केल्या. दौरा यशस्वी केलेल्या पुत्राची भेट होताच, अभिमानाने ऊर भरून आलेल्या माता सुशीला यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
सुरक्षित वाहन चालविणे हा संदेश समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी मुंबई ते सिंगापूर व सिंगापूर ते पुणे असा सुमारे २५ हजार किलोमीटरचा दुचाकीवरचा प्रवास शहरातील राहुल देशमुख व पुण्यातील युहान मुबारकी यांनी केला आहे. सात राष्ट्रांचा हा प्रवास त्यांनी १८ मार्चला सुरू केला. ७ मे रोजी त्यांच्या दुचाकी दौऱ्याचा समारोप झाला. ४५ दिवसांत त्यांनी इंदोर, लखनौ, इंम्फाळ, इमोरेहा, म्यानमार, कंबोडिया, लाओस, व्हीएतनाम, थायलंड, बँकॉक, मलेशिया व सिंगापूर असा प्रवास केला. त्याचमार्गे ते परत आले. शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
प्राधिकरणातील राहुल देशमुख व पुण्यातील युहान मुबारकी या दोन तरुणांनी दीड महिन्यात २५ हजार किलोमीटरचा दुचाकीवर प्रवास केला. त्यांच्या आई- वडिलांनी जिद्दी मुलांच्या यशस्वी कामगिरीबद्दल कौतुक केले. (प्रतिनिधी)