खडकवासला साखळीत २५ टीएमसी पाणी; पावसाचा जोर कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 12:30 PM2019-08-02T12:30:48+5:302019-08-02T12:33:52+5:30
गेले चार दिवस होत असलेल्या पावसामुळे धरणात पाणी जमा होत आहे.
पुणे : जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला आहे. गेले चार दिवस होत असलेल्या पावसामुळे धरणातपाणी जमा होत आहे. गुरुवारी सायंकाळी खडकवासला साखळीतील चारही धरणातील पाणीसाठा २५ अब्ज घन फुटांवर (टीएमसी) गेला. जिल्ह्यातील धरणातून होत असलेल्या विसगार्मुळे उजनी धरणात १२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
शनिवारी (दि. २७) रात्री पासून जिल्ह्यात काही दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पावसास सुरुवात झाली. जवळपास पाच दिवस दमदार बरसल्यानंतर गुरुवारी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला. खडकवासला साखळीतील वरसगाव आणि पानशेत या दोनही धरणातील पाणीसाठा दहा टीएमसीच्या वर गेला आहे. टेमघर धरणात गुरुवारी सायंकाळी पाच पर्यंत ५५, वरसगाव ४६, पानशेत ३८ आणि खडकवासल्यात ८ मिलिमीटर पाऊस झाला.
पानशेत धरणात १०.१९ (९५.७३ टक्के) टीएमसी साठा झाला असून, धरण भरण्याच्या मार्गावर आहे. वरसगाव धारणात १०.२० टीएमसी (७९.५७ टक्के), टेमघरमधे २.६१ टीएमसी (७०.४८ टक्के) आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा आहे. चारही धरणात मिळून २५ टीएमसी (८५.७० टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणातून मुठा नदीत २,५६८ क्सुसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यात ३,४२४ आणि दुपारी चार वाजता ९,४१६ क्सुसेक पाणी सोडण्यात येत होते.
जिल्ह्यातील येडगाव धरणातून २१६५, वडज ८३७, चासकमान ७३२५, वडीवळे ७५३, आंद्रा १४६२ आणि कासारसाई धरणातून २०० क्सुसेकने पाणी सोडण्यात आले. सकाळी बंडगार्डन बंधाºयाजवळ १८ हजार २२१ क्सुसेकने होणारा विसर्ग सायंकाळी सहा पर्यंत २२ हजार ५५ क्युसेकपर्यंत वाढला होता. तर, दौंड येथे हा विसर्ग २४ हजार ३४८ क्सुसेक होता. त्यामुळे उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी पाच पर्यंत धरणात ७.१६ टीएमसी साठा होता. त्यात गुरुवारी सायंकाळी पाच पर्यंत १२.५९ टीएमसी (२३.५० टक्के) पर्यंत वाढ झाली.
--
गुंजवणी, नीरा-देवघरचा साठा ८० टक्क्यांवर
गुंजवणी धरणपाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात २६, निरा देवघर १९, भाटघर २५, वीर ९ आणि नाझरे धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणी धरणात ३.४९ (९२ टक्के), निरा देवघर ९.९१ (८४ टक्के), भाटघर धरणात १९.१० टीएमसी (८१ टक्के) आणि वीर धरणात ९ टीएमसी (९५ टक्के) पाणीसाठा झाला आहे.