‘शारदा गणेश’ मंदिरातून २५ तोळे दागिने चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:09 AM2021-01-09T04:09:14+5:302021-01-09T04:09:14+5:30
पुणे : पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा श्री अखिल मंडई मंडळाच्या मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने श्री शारदा ...
पुणे : पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा श्री अखिल मंडई मंडळाच्या मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने श्री शारदा गजाननाच्या मूर्तीवरील २५ तोळ्यांची आभूषणे लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस घडली.
दिवसा गजबजलेल्या मंडई परिसरात रात्रीच्या वेळी वर्दळ कमी असते. याचाच फायदा घेत मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास एक चोरटा श्री शारदा गजानन मंदिरात शिरला. चोरट्याने मंदिरातील सभामंडपाकडे जाणारा मागील बाजूचा दरवाजा कटावणीने उचकटला. त्यानंतर सभामंडपातील शारदा-गजाननाच्या मूर्तीवरील सुवर्णहार, कंठी, मंगळसूत्र अशी २५ तोळ्यांची आभूषणे चोरली.
चोरी केल्यानंतर चोरटा परिसरात काही काळ घुटमळत होता. मंदिराच्या मागील बाजूस तो गेल्याचे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपले आहे. नित्य पूजेसाठी सकाळी पुरोहित आल्यानंतर मूर्तीवरील आभूषणे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, पदाधिकारी संजय मते यांना दिली. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात धाव घेतली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांनी घटनास्थळी भेट दिली. मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पुरोहित श्रीपाद कुलकर्णी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके आल्याचे असे पोलीस निरीक्षक टिकोळे यांनी सांगितले.
चौकट
आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसतो
“मंदिरात २०१५ मध्ये श्री शारदा गजाननाच्या मंदिरात चोरी झाली होती. त्या वेळी जवळपास एक कोटी रुपयांची आभूषणे चोरीला गेली होती. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे दोन दिवसांत आरोपीला पकडण्यात यश मिळाले होते. त्या वेळी मंदिरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मंदिरातील दरवाजे, खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवल्या. रात्रपाळीत रखवालदार नेमला. टाळेबंदीत रखवालदार मूळगावी गेल्याने मंदिरात रखवालदार नव्हता. चोरट्याने २४ ते २५ तोळ्यांची आभूषणे चोरली आहेत. आरोपीचा चेहरा सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतो आहे. पोलिसांनी चोराला पकडून देण्याची ग्वाही दिली आहे. आता लाकडी दरवजाला नवीन शटर लावून घेत आहोत. ज्यायोगे असा प्रसंग पुन्हा घडू नये,” असे मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले.