२५ वर्षांपूर्वी जडला सायकलिंगचा छंद; वयाची ६६ वर्षे पूर्ण केली, अजूनही मी तरुण
By प्रशांत बिडवे | Published: August 22, 2023 01:52 PM2023-08-22T13:52:47+5:302023-08-22T13:53:08+5:30
आम्ही पती-पत्नी दाेघांनी मिळून पायी ३६०० कि.मी.ची नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केली
पुणे : ‘मला सुमारे २५ वर्षांपूर्वी सायकलिंगचा छंद जडला. मी दैनंदिन कामासाठी सायकल वापरताे. सायकलवर धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासह दूरवर सायकलवर भटकंती करू लागलाे. सायकल प्रवासात नवनवीन माणसे जाेडण्यासह प्रदेश जवळून पाहता आला, साेबतच माझे आराेग्य चांगले राहण्यास मदत झाली. सायकलिंगच्या छंदामुळे मला आराेग्याची गुरुकिल्ली सापडली असून, वयाची ६६ वर्षे पूर्ण केली असली तरी अजूनही मी तरुण आहे, असे वाटते,’ असे ज्येष्ठ सायकलपटू प्रकाश पाटील यांनी सांगितले.
प्रकाश पाटील (वय ६६, रा. माेशी ) हे मूळचे धुळे जिल्ह्यातील तरवाडे या गावचे आहेत. नाेकरीच्या शाेधात १९७९ साली पुण्यात आले. इंडिया कार्ड क्लाेथिंग कंपनीत दहा वर्षे काम केले. त्यानंतर पीएमपीएमएल कंपनीत २८ वर्षे मॅकेनिक फिटर म्हणून नाेकरी केली. मला लहानपणापासून सायकलिंगची आवड आहे. साधारण १९९५-९६ पासून सायकलिंगला सुरुवात केली. दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर करताना दरराेज किमान १५ ते २० किमी सायकलिंग हाेते. मी जून महिन्यांत ६७व्या वर्षांत पदार्पण केले आहे. मला रक्तदाबाचा त्रास आहे. मात्र, सायकलिंगमुळे शारीरिक आराेग्य उत्तम ठेवण्यास खूप माेलाची मदत झाली, असे पाटील म्हणाले.
‘आम्ही पती-पत्नी दाेघांनी मिळून पायी ३६०० कि.मी.ची नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केली. तत्पूर्वी मी पुणे ते नेपाळ २०१९, स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, गाणगापूर, अक्कलकाेट, नळदुर्ग आदी धार्मिक ठिकाणांवर सायकलवर फिरलाे आहे. तसेच सलग सायकलिंग करीत ६०० किमी ‘बीआरएम’चे अंतरही पूर्ण केले आहे.
तीन वर्षांपासून पंढरपूर सायकल वारी
मागील तीन वर्षांपासून सरासरी प्रत्येक महिन्याला एकादशी दिवशी माेशी ते पंढरपूर सायकल वारी करताे आहे. साधारण जाण्यासाठी सुमारे १४ तासांचा कालावधी लागताे. या दरम्यान, रस्त्याने भेटणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांशी भेटून गप्पा मारत जाताे.
सायकलिंगचे फायदे
- शारीरिक, मानसिक आराेग्य उत्तम राहते.
- सायकलिंग माणसे जाेडण्यास मदत झाली
- ज्येष्ठांची पचनशक्ती चांगली राहते.
- हाडे आणि स्नायू बळकट राहतात.
- नवनवीन प्रदेश जवळून पाहायला मिळाला.
सायकलवर करणार ३६ जिल्ह्यांचा दाैरा
सायकलवर राज्यातील ३६ जिल्ह्यांत प्रवासाला येत्या २७ ऑगस्ट राेजी सुरुवात करणार आहे. या साेलाे सायकल दाैऱ्यांत संपूर्ण महाराष्ट्र जवळून पाहणार आहे. तीन महिने कालावधीमध्ये सुमारे ६ हजार किमीचा सायकल प्रवास नियाेजित आहे. प्रत्येक जिल्ह्यांतील माती आणि पाणी संकलित करणार आहे. त्यानंतर दिघीतील दत्तगड येथे ३६ जिल्ह्यांच्या नावाने झाडे लावणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.