मंगलमूर्ती मोरया! गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी पुणे विभागातून एसटीच्या २५० बस
By नितीश गोवंडे | Published: August 25, 2022 07:16 PM2022-08-25T19:16:39+5:302022-08-25T19:16:58+5:30
बस स्थानकावरून जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी २७ ऑगस्ट पासून ५० स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे
पुणे: गणेशोत्सव आणि कोकण यांचे एक समीकरण आहे. कोकणातीलगणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. तसेच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. नोकरीसाठी पुण्यात आलेल्या कोकणवासीयांना पुण्यातच दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करावा लागला. पण यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने चाकारमान्यांनी आपल्या गावी जाण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून, या पार्श्वभुमीवर कोकणवासियांसाठी २५० विशेष बसची व्यवस्था पुणे एसटी विभागातर्फे करण्यात आली आहे. यासह इतर शहरांमध्ये जाण्यासाठी देखील १५० स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोकणात जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी १७० बस नियुक्त केल्या असून त्यातील १२० बस बुक झाल्या आहेत. यासह ३० बस ग्रुप बुकिंगद्वारे बुक करण्यात आल्या आहेत. यासह बस स्थानकावरून जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी २७ ऑगस्ट पासून ५० स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या शहरात जाण्यासाठी १५० स्वतंत्र बसची व्यवस्था पुणे एसटी विभागाकडून करण्यात आली आहे.
मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा संख्या देखील मोठी असते, तेथूनही जादा बस कोकणात दरवर्षी सोडल्या जातात. यासाठी पुणे विभागातून २२० बस मुंबई विभागाला देण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक ज्ञानेश्वर रणवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.