मेंदूच्या विकारासाठी २५ हजार रुपये देणार - विश्वास देवकाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:27 AM2018-08-13T01:27:34+5:302018-08-13T01:28:05+5:30
जिल्हा परिषदेने महाआरोग्य शिबिरे सुरू केली आहेत. त्यामध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठीदेखील तपासणी शिबिर सुरू आहेत. आता मेंदूच्या विकारासाठी देत असलेले १५ हजार रुपये उपचारांसाठी कमी पडतात म्हणून २५ हजार रुपयांची मदत देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली.
बारामती - जिल्हा परिषदेने महाआरोग्य शिबिरे सुरू केली आहेत. त्यामध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठीदेखील तपासणी शिबिर सुरू आहेत. आता मेंदूच्या विकारासाठी देत असलेले १५ हजार रुपये उपचारांसाठी कमी पडतात म्हणून २५ हजार रुपयांची मदत देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली.
जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या सहकार्याने बारामती येथील महिला रुग्णालयात आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन देवकाते यांनी केले. ते म्हणाले की, बारामतीत मागील महाआरोग्य शिबिरात तीन हजारांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्या. मागील वर्षी २३ हजार रुग्ण तपासण्यात आले. शिबिराचे नियोजन उत्कृष्ट होत असल्यामुळे रुग्णांचाही मोठा प्रतिसाद मिळात आहे.
जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने म्हणाले की, मागील वर्षी ५६ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यंदा जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरांमध्ये सहा तालुक्यांत आतापर्यंत २६ हजार रुग्णांची तपासणी झालेली आहे. तसेच, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कॅन्सरमुक्त अभियान सुरु आहे. या वेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या वेळी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, पंचायत सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, मीनाक्षी तावरे, रोहिणी तावरे, अभिजित तांबिले, संदीप जगताप, संभाजी होळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन धनवान वदक यांनी केले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
शिबिरात १६,५०० रुग्णांची तपासणी
बारामती : बारामती एमआयडीसीतील महिला रुग्णालयात महाआरोग्य शिबिरात रुग्णांनी मोठी गर्दी केली होती. रविवारी(दि. १२) राज्यातून १२९ दवाखान्यांमधील ४५० हून अधिक डॉक्टरांनी तालुक्यातील १६ हजार ५०० रुग्णांची तपासणी व उपचार केले. या शिबिरात मुंबई, पुण्यासह, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील ३६ मोठ्या खासगी मल्टीस्पेशालिटी दवाखान्यांसह १२९ दवाखाने सहभागी झाले होते.
बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात झालेल्या या शिबिरात नियोजनामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनदेखील गर्दी न होता रुग्णांची तपासणी व्यवस्थित झाली. या शिबिरासाठी रुग्णालयाबाहेर एकाच वेळी १०० रुग्णांची काही क्षणात नोंदणी होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. बारामतीतील तुळजाराम चतुरचंद, विद्या प्रतिष्ठान व शारदानगरच्या शैक्षणिक संकुलांमधील विद्यार्थ्यांनी यामध्ये स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडली. रुग्णांसाठी बारामती तालुक्यातील गावागावातून बसची व्यवस्था करण्यात आली होती. छत्रपती, सोमेश्वर व बारामती अॅग्रो कारखान्यांनी सोय केली होती. बारामती शहरातील रुग्णांसाठी रिक्षा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती.
अनेक रुग्णालयांचा उत्स्फूर्त सहभाग
या शिबिरात मुंबई, पुण्यासह बारामती शहरातील बहुतेक सर्व दवाखाने अशा एकूण खासगी ३६ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांसह पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील तज्ज्ञ, विविध संघटनांनीही या शिबीरासाठी हातभार लावला. रुग्णांसाठी राज्यभरातून मदतीचे हात सरसावले होते. रुग्णांसाठी दानशूरांकडून केळी व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.