स्मार्ट सिटीसाठी २५ जूनचा मुहूर्त
By admin | Published: April 17, 2016 03:02 AM2016-04-17T03:02:30+5:302016-04-17T03:02:30+5:30
स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेकडून २५ जूनचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय स्मार्ट सिटीसाठी नेमण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट लिमिटेड
पुणे : स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेकडून २५ जूनचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय स्मार्ट सिटीसाठी नेमण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट लिमिटेड या कंपनीच्या सोमवारी (दि. १८) होणाऱ्या पहिल्यावहिल्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
२५ जून २०१६ अथवा त्यापूर्वीच या योजनेत सहभागी झालेल्या शहरांनी स्मार्ट सिटीचे काम सुरू करावे, असे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार, पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, संचालक मंडळाच्या बैठकीसमोर तब्बल ३१ विषयांची कार्यक्रमपत्रिका ठेवण्यात आली असून त्यात प्रामुख्याने कंपनीचे आर्थिक वर्ष निश्चित करणे, अध्यक्षांना अधिकार देणे, कंपनीच्या प्राथमिक खर्चांना मान्यता देणे, कंपनीसाठी कर्मचारी नेमणे, तातडीच्या प्रकल्पांना मान्यता देणे अशा विषयांचा समावेश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिकेकडून कंपनी स्थापनेसह सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कंपनीच्या १५ सदस्य असलेल्या संचालक मंडळाची पहिली बैठक सोमवारी होणार आहे. त्यासाठीची कार्यक्रमपत्रिका प्रशासनाकडून सर्व सदस्यांना पाठविण्यात आली आहे.
तीन ते चार प्रकल्प होणार सुरू
स्मार्ट सिटी योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जून २०१५ रोजी केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ पर्यंत शहरांची निवड, योजनेसाठीचा निधी, तसेच योजनेबाबतचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. मागील महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने २५ जून २०१६ पूर्वी निवड झालेल्या शहरांनी काम सुरू करावे, अशा सूचना केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केल्या होत्या. त्यानुसार, संचालक मंडळाकडून सोमवारी होणाऱ्या बैठकीत काम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार, या तारखेपूर्वी ३ ते ४ प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविणे तसेच इतर कामांसाठी आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाचे स्वरूप लक्षात घेऊन २५ जूनपूर्वी काम सुरू करण्याचाही प्रयत्न राहणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात बाणेर-बालेवाडी
स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराने दुसरा क्रमांक पटकावला असून योजनेच्या पहिल्या टप्प्यात बाणेर-बालेवाडी परिसराचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी अवघ्या दोन दिवसांपूर्वीच १९४ कोटींचा खर्च केंद्र शासनाने राज्य शासनाकडे वितरीतही केला आहे, तर या प्रकल्पासाठी कंपनीच्या अध्यक्षपदी महापालिका आयुक्तांची नियुक्ती केली आहे.
केंद्र शासनाकडून २५ जूनपूर्वी काम सुरू करण्याच्या सूचना आहेत. मात्र, त्यापूर्वीच काम सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्याअनुषंगाने पहिल्या बैठकीत काम सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असून कोणते प्रकल्प सुरू करता येतील, यावर चर्चा केली जाणार आहे.
- कुणाल कुमार (महापालिका आयुक्त)