३० मिनिटे : २६ वाहनचालक : एकाकडेही लायसन्स नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 09:28 PM2018-08-22T21:28:07+5:302018-08-22T21:48:10+5:30
स्मार्ट सिटी, वास्तव्य करण्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर म्हणून रुबाब मिरवणाऱ्या पुणे शहरातील वाहतूककोंडीची कायम चर्चा होत असते.
पुणे : स्मार्ट सिटी, वास्तव्य करण्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर म्हणून रुबाब मिरवणाऱ्या पुणे शहरातील वाहतूककोंडीची कायम चर्चा होत असते. याचा पुन्हा प्रत्यय आला असून शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या फक्त अर्धा तासाच्या कारवाईत २६ वाहने पकडण्यात आली असून त्यातल्या एकाही वाहनचालकाकडे लायसन्स नसल्याचे आढळले आहे.
शहरात असणाऱ्या नागरिकांच्या संख्येपेक्षा वाहनांची अधिक संख्या आणि मर्यादित रुंदीचे रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. मात्र नागरिकही तितक्याच बेफिकीरपणा दाखवत सिग्नल मोडत, नियमांना बगल देत वाहन चालवताना दिसतात. शहरातील शिवाजीनगर भागातील शिमला ऑफिस चौकात संध्याकाळी वाहतूक पोलिसांनी संध्याकाळी सव्वासहा ते पावणेसातच्या दरम्यान केलेल्या कारवाईत २५ मोटार सायकल आणि एक रिक्षाला जॅमर लावला. ही सर्व वाहने थांबवून चौकशी केली असताना त्यातल्या एकाही वाहन चालकाकडे लायसन्स नसल्याचे लक्षात आले. अर्थात दंड करून या चालकांना सोडून दिले असले तरी शहारातील वाहतूक स्थितीचा नमुनाच या अर्धा तासात बघायला मिळाला आहे.
याबाबत वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले यांनी सांगितले की, या प्रकारचे वाहनचालक संपूर्ण शहरात असून त्यांच्यावर वाहतूक शाखेतर्फे येत्या काळात कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून शहराला स्मार्ट करण्यात मदत करावी.