इंदापूर तालुक्यात ऐन थंडीत वातावरण तापणार! २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 06:16 PM2022-11-12T18:16:59+5:302022-11-12T18:20:02+5:30
राज्य सरकारकडून ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
कळस (पुणे) :इंदापूर तालुक्यात मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी महिनाअखेर सुरू होणार असून, या ग्रामपंचायतींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे ऐन थंडीत या गावांमध्ये वातावरण तापणार आहे.
राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत.
नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल.
इंदापूर तालुक्यात सर्वच निवडणुका या चुरशीने होतात. तसेच या ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे आगामी काही कालावधीत होणाऱ्या या ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी चालवली आहे. ग्रामपंचायतीनंतर आगामी काही महिन्यांत तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ऐन थंडीत या गावांमध्ये वातावरण तापणार आहे
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी अध्यक्ष महारुद्र पाटील, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांच्या गावांचा निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये समावेश आहे.
पडस्थळ, मदनवाडी, माळवाडी, रणमोडवाडी, डाळज नं. २, बीजवडी, लाखेवाडी, थोरातवाडी, जांब, बोरी, न्हावी, हिंगणवाडी, झगडेवाडी, कळाशी, कुरवली, म्हसोबावाडी, मानकरवाडी, रेडणी, डाळज नं.१, डाळज नं.३, बेलवाडी, डिकसळ, अजोती, सराटी, पिंपरी खुर्द, गंगावळण, या इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.