भामा आसखेड जॅकवेलच्या पूर्णत्वाला २६ जानेवारीची डेडलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 05:31 PM2019-08-03T17:31:01+5:302019-08-03T17:39:32+5:30
महापालिका भामा आसखेड धरणामधून शहरासाठी पाणी आणणार आहे...
पुणे : पुण्याच्या पूर्वी भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने भामा आसखेड धरणामधून पाणी आणण्याच्या कामाला मे महिन्यात पोलीस बंदोबस्तामध्ये सुरुवात केली. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी २६ जानेवारी २०२० ची डेडलाईन ठरविण्यात आली आहे. त्यामुळे चाकण येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या कामालाही गती देण्यात आली आहे.महापालिका भामा आसखेड धरणामधून शहरासाठी पाणी आणणार आहे. या योजनेमधून शहराच्या पूर्वभागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. पुणे नगर रस्त्यावरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव. धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गेली अनेक वर्ष स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम रखडले होते. जमिनीच्या बदल्यात जमीन अशी शेतकऱ्यांची मागणी होती.
शासनाने हेक्टरी १५ लाख रुपये मोबदला जाहीर केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात विरोध सुरुच ठेवला होता. पालिकेने नुकतेच मोबदल्यापोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या जॅकवेलमधून पाणी उपसण्याचे आणि पंप बसविण्याचे काम सुरु करण्यात आले होते. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन होते. पावसाळ्यात कामाचा वेग मंदावल्याने उद्घाटनाची तारीख जानेवारी महिन्यात जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या प्रकल्पाचे काम आणि सिंचन पुनर्स्थापना खर्च किंवा प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात १८५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
====
भामा आसखेडच्या जॅकवेलमधून उचलले जाणाऱ्या पाण्याच्या शुध्दीकरणासाठी चाकणमध्ये जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. हे काम साधारणपणे २०१५-१६ मध्ये सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत ७० टक्क्यांच्या आसपास काम पूर्ण झाले असून पालिकेने त्यासाठी दहा एकर जागा संपादीत केली होती. भामा आसखेड जॅकवेलसह चाकण येथील जलशुद्धीकरण केंद्राचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.