प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी भाड्याने आणलेले २६ लाख ६० हजारांचे कॅमेरे परस्पर ठेवले गहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 07:56 PM2018-12-07T19:56:28+5:302018-12-07T20:02:37+5:30
महागडे कॅमेरे परस्पर गहाण ठेवत त्यातून मिळालेल्या पैशांतून प्रेयसीचे दुचाकी घेवून तिचे लाड पुर्ण करणा-या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाड्याने आणलेले महागडे कॅमेरे परस्पर गहाण ठेवून त्यातून मिळालेल्या पैशांतून प्रेयसीचे दुचाकी घेवून तिचे लाड पुर्ण करणा-या प्रियकराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून २६ लाख ६० हजार रुपये किंमतीचे दहा ५ डी कॅमेरे, ५ लेन्स जप्त करण्यात आल्या आहेत.आकाश पांडुरंग भिसे (वय २२, हमालनगर, मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशनचे तपास पथक गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली, एक तरुण केंजळे चौकात आला असून त्याच्याकडे चोरी केलेला महागडा कॅमेरा आहे.पोलीस नाईक विकास बो-हाडे व शंकर कुंभार यांना मिळालेल्या या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी बापूसाहेब खुटवड, केदार आढाव, शंकर कुंभार, सयाजी चव्हाण यांच्यासह पथकाने सापळा लावून भिसे याला कॅमे-यासह ताब्यात घेतले.
भिसे हा फोटोग्राफर असून त्याचे चार महिन्यांपुर्वी एका मुलीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र तिचे लाड पुरविण्यासाठी भिसे यांच्याकडे पुसेरे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने लग्नाच्या शुटींगच्या आॅर्डर मिळाल्या असल्याचे सांगून शहरातील वेगवेगळ्या फोटोग्राफरकडून महागडे कॅमेरे भाड्याने घेतले. कॅमे-याचे दिवसाला १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपये भाडे ठरले होते. मात्र प्रत्यक्षात कॅमे-यांचा शुटिंगसाठी वापर न करता त्याने ते सर्व कॅमेरे गहाण ठेवून काही पैसे उसने घेतले. या पैश्यातून प्रेयसीला एक स्कूटी घेऊन दिली. तर उर्वरीत पैशांतून तिच्यासाठी सोन्याचे दागिने घेतले. तसेच महागड्या हॉटेलमध्ये जेवणासाठी घेवून जात प्रेयसीचे लाड पुरविले. वेळेत कॅमेरे परत न केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली.