अमेरिकेतील भावाचे प्रोफाईल ठेवून पुणेकराला २६ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 11:45 AM2022-04-15T11:45:44+5:302022-04-15T11:50:02+5:30
ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २६ लाखांना गंडा...
पुणे : माझ्या भारतातील एका मित्राच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला असून, त्याला पैशांची गरज आहे. मी सांगतो त्या खात्यावर काही पैसे पाठव. मी तुला लगेच येथून डॉलर पाठवतो, असा व्हॉट्सॲपवर अमेरिकेत असलेल्या भावाचा फेसबुकवरील फोटो व्हॉट्सॲप प्रोफाईल असलेला मेसेज एका ज्येष्ठ नागरिकाला आला. तो खरा वाटून त्याप्रमाणे पैसे पाठविले. बनावट प्रोफाईल ठेवून सायबर चोरट्याने डॉलर पाठविल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २६ लाखांना गंडा घातला आहे.
या प्रकरणी ६८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ज्येष्ठ नागरिक असून ते सुखवस्तू आहेत. त्यांच्या मुलाचा व्यवसाय आहे. त्यांचा भाऊ अमेरिकेत राहतो. त्यांचा तेथे कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायबर चोरट्याने फिर्यादींच्या भावाचा व्हॉट्सॲप प्रोफाईल असलेल्या एका क्रमांकावरून मेसेजद्वारे संपर्क साधला. त्यांना संशय येऊ नये म्हणून चोरट्यांनी अगोदरच नेटवर्क प्रॉब्लेम असल्याचे कारण सांगितले. फिर्यादींना भाऊ बोलत असल्याचे वाटल्याने त्यांनी त्यांच्यासोबत संवाद सुरू ठेवला. भारतातील माझ्या एका मित्राच्या कुटुंबीयांना कोरोना झाला असून, त्यांना पैशांची गरज असल्याचे सांगून ५ लाख रुपये नितीन दहिया नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर भरण्यास सांगितले. फिर्यादींना भाऊ सांगतो आहे असे वाटल्यामुळे त्यांनी त्या खात्यावर पैसे भरले.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादींना त्यांच्या व्हॉट्सॲप मेसेजवर त्यांच्या खात्यात डॉलर भरल्याचे स्क्रीनशॉट पाठवले. त्यामुळे त्यांना आणखीनच खात्री वाटली. फिर्यादी हे जाळ्यात अडकल्याचे पाहून चोरट्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत ५ ते ६ वेळा एकूण २६ लाख रुपये विविध कारणे सांगून भरून घेतले. त्या बदल्यात प्रत्येकवेळी डॉलर पाठविल्याचे स्क्रीनशॉट टाकून दोन दिवसांत पैसे जमा होतील, असे सांगितले. आरोपी पैसे मागत राहिले आणि फिर्यादी भरत गेले. एके दिवशी फिर्यादींनी बँकेत जाऊन खात्यावर डॉलर जमा झाले की नाही हे पाहिले. तेव्हा असे कोणतेच पैसे त्यांच्या खात्यावर आले नसल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, संशय आल्यामुळे त्यांनी आपल्या भावाला फोन करून विचारणा केली. त्यावेळी त्याने आपण पैसे मागितले नसल्याचे सांगितले. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.