पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात २६ मेंढ्यांचा मृत्यू; अडीच ते तीन लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:47 PM2022-05-28T13:47:16+5:302022-05-28T13:48:38+5:30
शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी...
दहिटणे (ता.दौंड): येथील शिंदेमळा परिसरातील मेंढपाळांच्या पालावर भरदिवसा बिबट्याने बेधडक हल्ला चढवून सुमारे २६ मेंढ्यांचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच नुकसान भरपाईची मागणी मेंढपाळ संपत सोमनाथ थोरात यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दहिटणे गावानजीक असलेल्या शिंदेमळा येथे मेंढपाळ संपत सोमनाथ थोरात व नवनाथ यशवंत बोरकर यांचा वाडा शेतकरी दिगंबर मगर यांच्या शेतात मुक्कामी होता. मेंढपाळ बकऱ्यांना चारा चारण्यासाठी घेऊन इतर ठिकाणी गेले असता शुक्रवार (दि.२७) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मेंढपाळ यशवंत बोरकर यांंची अकरा तर संपत सोमनाथ थोरात यांंची पंधरा बकरी यांच्यावर हल्ला चढवला.
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकूण सव्वीस बकरी व लहान पिल्ले जागीच ठार झाले आहेत. घटनेचा पंचनामा यवत वनपाल गणेश पवार, वनरक्षक शिवकुमार बोंबले, विलास होले, वन कर्मचारी सहकारी यांनी केला आहे. यावेळी सरपंच दादासाहेब कोळपे, मिरवडीचे सरपंच सागर शेलार यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठीच्या उपाययोजना तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी वन खात्याकडे केली आहे.